नांदेड - शहर व जिल्ह्याला दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत असून त्याचे चटके नागरिकांना बसत आहेत. विष्णुपुरी जलाशयात केवळ दोन दशलक्ष घनमीटरच पाणीसाठ उपलब्ध आहे. यामुळे शहरवासियांना चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.
दुष्काळी परिस्थिती व उन्हाची तीव्रता वाढत असल्याने शहरातील ७० ते ८० टक्के बोअरवेल आटले आहेत. महापालिकेने आपले हातपंप दुरूस्त केले असले तरी त्यातील बऱयाच हातपंपाला पुरेसे पाणी नसल्याच्या तक्रारी आहेत. जमीनीतील पाणी पातळी घटल्यामुळे पॉवरपंप देखील निकामी ठरत आहे. अशा परिस्थितीत सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
नांदेड उत्तर भागाला इसापूर धरणातून पाणीपुरवठा सुरू आहे. आसना बंधाऱ्यात दर महिन्याला एक दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा उपलब्ध होत आहे. हे पाणी नांदेड उत्तर भागास किमान २० दिवस पुरेल आणि दक्षिण भागासाठी विष्णुपुरी जलाशयातील पाणी उचलून शहरवासियांची तहान भागवण्याचा प्रयत्न केला जात आहे. विष्णुपुरी जलाशयातील उपलब्ध पाण्याने तळ गाठला असून तो साठा कधीही संपू शकतो. त्यानंतर मृत्तसाठ्यातून पाणी उचलण्याची तयारी मनपाने सुरू केली आहे.
दरम्यान, चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असला तरी पाण्याच्या अपव्ययावर नियंत्रण आणण्यासाठी अद्याप कोणतीही कठोर पावले उचललेली नाहीत. तसेच छुप्या मार्गाने विष्णुपुरी जलाशयातील पाणीउपसा सुरूच आहे. गस्ती पथक नेमण्यात आलेले फक्त नावालाच आहे. बांधकामावर पाणी वापरण्यास बंदी आणली नाही. तोट्या नसलेल्या नळ जोडण्या तोडल्या नाहीत. रस्त्यावर सडा टाकणे, गाड्या धुणे यासह अन्य प्रकार सुरूच आहेत. उपाययोजना करण्याऐवजी कठोर निर्णय घेण्यासाठीच महापालिकेची यंत्रणा आहे काय, असा सवालही जनतेतून उपस्थित केला जात आहे.