नांदेड - टँकर मंजुरीसाठी माहूर तालुक्यातील मेंढकी, मुंगशी, पाचोंदा आणि सिंदखेड या चार गावांचे प्रस्ताव ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे पाठवून दिले आहेत. याला एक महिन्याच्या जवळपास कालावधी लोटला. तेव्हा प्रशासनाने प्रक्रिया पूर्ण करून टँकर मंजूर केले. मात्र ही मंजूरी मिळूनही 8 दिवस लोटले तरी, अद्याप आदिवासी बंजारा बहुल गावात पाण्याचे टँकर पोहोचले नाहीत. त्यामुळे अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागात भटकंती करावी लागत आहे.
या वर्षी पुन्हा एकदा दुष्काळाची स्थिती तीव्र असून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मात्र, या गंभीर प्रश्नाकडे माहूर तालुक्यात प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना राबवण्यात येत नाही. माहूर तालुक्यातील मेंढकी, मुंगशी, पाचोंदा आणि सिंदखेड या चार गावांत पाणीटंचाई तीव्र बनली असून एका हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे. पाण्याचा टँकर सुरू करावा, यासाठी पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात प्रस्ताव सादर करून महिना लोटत आला आहे. तरीही प्रशासन कोणतीही भूमिका घेत नसल्याने, नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
टंचाईग्रस्त गावांमधील सरपंचानी टँकर सुरू करावा, अशी मागणी प्रशासनाला निवेदनाद्वारे केली. तेव्हा प्रशासनाने टँकरची मान्यता दिली असली तरी अद्याप टँकर या गावामध्ये पाणीपुरवठा केला जात नाही. यामुळे प्रशानसाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. राज्यात लोकसभेसाठी आचारसंहिता लागू असतानाही, दुष्काळाची संबंधीच्या कामाला तात्काळ मंजूरी देण्यात यावी, असे आदेश देण्यात आले होते. मात्र, अद्यापही काही उपाययोजना प्रशासनाने प्रत्यक्ष कामाला सुरूवात करुन केलेल्या नाहीत. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.