नांदेड - जिल्ह्यात यंदा मार्च महिन्याच्या अखेपासून अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. नांदेड, भोकर व मुखेड तालुक्यातील एकूण ३५ गावे आणि १८ वाड्यांवर ४३ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. सर्वाधिक ३१ टँकर एकट्या मुखेड तालुक्यात सुरू आहेत.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे ग्रामीण भागांत नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. येणाऱ्या काळातही ही समस्या आणखी गंभीर होण्याची चिन्हे आहेत. तालुक्यातील ७ गावे आणि तीन वाड्यांमध्ये एकूण ११ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मुखेड तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ३१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
वरील तीन तालुक्यातील ७६ हजार १९३ एवढ्या लोकसंख्येला टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, मुखेड तालुक्यातील २९ गावे, नांदेड तालुक्यातील ८ लोहा तालुक्यातील ५५ गावे, अशा एकूण ९३ गावांमध्ये खासगी बोअर तसेच विहीर अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा करण्याची योजना आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने टंचाई आराखडा तयार केला आहे. यानुसार, उपाययोजना केल्या जातील.