नांदेड - जिल्ह्यात पावसाच्या जोरदार बॅटींगमुळे येलदरी, सिध्देश्वर धरण ओव्हरफ्लो झाल्याने हे पाणी नांदेडच्या गोदावरीत सोडण्यात येत आहे. नांदेडकरांना पिण्याचे पाणी पुरवणारा गोदावरी नदीवरील विष्णुपुरी हा प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. त्यामुळे प्रकल्पाचे चार दरवाजे आजपासून उघडले आहेत. सध्या 66 हजार 520 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून सर्वदूर संततधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे हिमायतनगर, माहूर, किनवट, भोकर या तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आला आहे. अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. तर, गोदावरी नदीवरील विष्णुपुरी हा प्रकल्प शंभर टक्के भरला असून यातून 66 हजार 520 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पाण्याचा येवा वाढल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. तर, नदीच्या पात्रात पाण्याची वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.