नांदेड - तालुक्यातील बाभूळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी असलेल्या चक्रधर मोरे यांच्या मुलाने (शिवहार मोरे) कुठलेही खाजगी क्लासेस न लावता जिद्दीने अभ्यास करून युपीएससी परिक्षेत 649 वा क्रमांक मिळवत हे यश मिळवले आहे. शिवहार मोरेचे यश पाहून आणि अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत केलेला अभ्यास आणि कष्ट पाहून भावूक होत त्याच्या वडीलांना आनंद अश्रू अनावर झाले.
ग्रामस्थांनीही केले जल्लोषात स्वागत -
नांदेड तालुक्यातील बाभूळगाव या गावातील अल्पभूधारक शेतकरी असलेल्या चक्रधर मोरे यांच्या मुलाने ग्रामीण भागाला हेवा वाटेल असे यश मिळवल आहे. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून इंजिनिअरिंग केलेल्या शिवहार मोरे या तरुणाने गतवर्षी यूपीएससीची परीक्षा दिली होती, मात्र त्यात त्याला यश आले नाही, एका अपयशानंतर पुन्हा जिद्दीने शिवहारने यूपीएससीची परीक्षा दिली आणि आता त्यात त्याला 649 वी रँक मिळाली आहे. त्याच्या या यशाचे बाभूळगावच्या ग्रामस्थानी जल्लोषात स्वागत केले आहे.
तिन्ही मूल आणि सून उच्च विद्याविभूषित -
बाभूळगाव येथील चक्रधर मोरे हे दहावी शिकलेले आहेत. त्यांना तीनही मुले आणि एक मुलगी आहे. त्यांनी अडचणीच्या परिस्थितीतही मुलांना उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. शेतीसह विविध कामेही केले. एक मुलगा बीए बीएड, दुसरा मुलगा इंजिनिअर, तर मुलगी एमबीबीएस आहे. तर माझी मोठी सुनही त्यांनी एमबीबीएस केली आहे. शिवहार मोरे चेही पुणे येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले असून मोठ्या कष्टातून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाला आहे.
जिल्ह्यात तिघांनी मिळवले यश -
केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससी परीक्षेत नांदेड जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे यश संपादन करणाऱ्यांमध्ये एक शेतकऱ्याचा, एक पत्रकाराचा तर एक पोलीस उपनिरीक्षकाचा असे मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत.
हेही वाचा - UPSC साठी सोडली अमेरिकेतील नोकरी....पाहा देशात 37 वा आलेल्या विनायक नरवडेची यशोगाथा