नांदेड - जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तामध्ये व्यस्त असल्याचे पाहून सोमवारी (दि.10 मे) जबरी चोरीच्या दोन घटना घडल्या. नांदेड शहरात दुपारी एक वाजताच्या सुमारास एका व्यापाऱ्यास पिस्तूल दाखवून 14 लाख 80 हजार तर दुसऱ्या घटनेत वडेपूरी (ता.लोहा) शिवारात पेट्रोलपंप व्यवस्थापकाच्या डोळ्यात तिखट टाकून आणि चाकू मारुन आठ लाखाची बॅग लंपास केली. यामुळे व्यापाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
डोळ्यात मिर्चीपूड फेकत लुटले
वडेपूरी (ता.लोहा) शिवारात पेट्रोलपंप व्यवस्थापकाच्या डोळ्यात तिखट टाकून आणि चाकू मारुन आठ लाखाची बॅग लंपास केली. या प्रकरणी सोनखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात भर दिवसा लूटमार
नवा मोंढा येथील योगेश मार्केटींग दुकानाचे मालक ओम बोरलेपवार हे बॅगमध्ये 14 लाख 80 हजार रुपयांची रक्कम घेवून बँकेत भरण्यासाठी मगनपूरा येथून चिखलवाडी कॉर्नरकडे जात होते. त्यांची दुचाकी हिंगोली गेट उड्डाण पुलावर आली असता, त्यांच्या पाठीमागून दुसऱ्या एका दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी ओम बोरलेपवार यांची दुचाकी अडविली. दुचाकीवरील एका चोरट्यांने बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्याने त्यांना चाकूचा धाक दाखवला. या दोघांनाही बोरलेपवार यांनी बॅग देण्यास नकार दिला. यावेळी तिसऱ्या आरोपींनी आपल्या जवळची पिस्तूल काढून त्यांच्या कानशिळावर लावली. यानंतर बोरलेपवार यांच्याकडील 14 लाख 80 हजार रुपये असलेली बॅग चोरट्यांनी हिसकावली. ही बॅग हातोहात लंपास करुन चोरट्यांनी पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख, वजिराबाद ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. यावेळी पोलिसांनी नवा मोंढा येथील दुकानातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली. पण, माहिती मिळू शकली नाही. शहरात दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा - लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडत आहे - हेमंत पाटील