नांदेड : मुखेड तालुक्यातील कुंद्राला येथील सकणुर परिसरात दोघे मित्र रात्री खेकडे पकडण्यासाठी गेले होते. परंतु शेतात रानडुकरांपासून बचावासाठी लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होवून दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. संभाजी पुंडलिक नागरवाड (२१), शिवाजी रामदास सुरूमवाड ( २०) अशी मृत मित्रांची नावे आहेत. तर त्यांच्या बचावासाठी गेलेले दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तारेचे कुंपण जीवावर बेतले : ग्रामीण भागात रानडुकरांचा मोठा वावर आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. सकणुर येथील एका शेतकऱ्यांने रानडुकरांपासून पिकांच्या संरक्षणासाठी शेताला तारेचे कुंपण घालून त्यात विद्युत प्रवाह सोडला होता. हे तारेचे कुंपण चार मित्रांच्या जीवावर बेतले आहे. त्यात संभाजी पुंडलिक नागरवाड (२१), शिवाजी रामदास सुरूमवाड ( २०) दोघांचा मृत्यू झाला, तर संजय मारुती नागरवाड ( २२ ), विजय संभाजी हंबीरे ( २२ ) यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अशी घडली घटना : कुंद्राळा येथील सूर्यकांत पाटील कुंद्राळकर यांची शेती सकणुर शिवारात तलावाच्या जवळ आहे. सकणुर येथील मोहन जाधव हा शेती करतो. पिकांचे रानडुक्कर, हरीण नुकसान करत असल्याने त्यांनी शेतास तारेचे कुंपण लावून त्यात रात्री विद्युत प्रवाह सोडला होता. दरम्यान, सोमवारी रात्री गावातील संभाजी पुंडलिक नागरवाड, शिवाजी रामदास सुरूमवाड, संजय मारुती नागरवाड, विजय संभाजी हंबीरे हे चौघेजण मासे, खेकडे पकडण्यासाठी तलावाखालील नदीवर जात होते. तलावापासून जात असताना शेताच्या बांधाजवळ लावलेल्या विद्युत कुंपणाचा स्पर्श संभाजी याच्या पायास झाला. त्यापाठोपाठ शिवाजी याचा देखील तारेस स्पर्श होऊन जोरदार विजेचा धक्का बसला. यावेळी शिवाजीचा हात विजय व संजय या दोघांना लागला. विजय व संजय बाजूला फेकले गेले. तर तारेस चिटकून बसल्याने संभाजी व शिवाजी या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळीच पंचनामा : संजय आणि विजय यांच्यावर मुखेड येथिल उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी ज्ञानेश्वार गायकवाड यांनी दिली. माहिती मिळताच मुक्रमाबाद पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक भालचंद्र तिडके, पोलिस उपनिरीक्षक गजानन काळे, पोलिस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हेही वाचा -