नांदेड - वर्षभरापूर्वी जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी बलात्कार केला होता. याप्रकरणी भोकर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दोघा आरोपींना 20 वर्षे शिक्षा व दंड सुनावला आहे. तर एकाची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, 15 वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या आईसोबत घरात झोपलेली होती. दरम्यान मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास तीन आरोपींनी घरात प्रवेश करून पीडित मुलीच्या आईच्या गळ्याला चाकु लावुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. याबाबत तिच्या आईने 26 नोव्हेंबर 2018 रोजी उमरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. यावरून आरोपी आनंदा सावंत, कुणाल उर्फ खंडू गायकवाड आणि शुभम देशमुख यांच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अभय देशपांडे आणि आय.पी.एस. अधिकारी शेख नूरुल हसन यांनी केला होता. सविस्तर तपासाअंती उमरी पोलिसांनी भोकर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. त्या गुन्ह्याचा आज 31 जुलै 2019 रोजी निकाल लागला आहे. आरोपींना या गुन्ह्यात दोषी धरून जिल्हा न्यायाधीश शेख यांनी 20 वर्षाची शिक्षा व प्रत्येकी 8 हजार रुपये दंड ठोठावला आहे, तर तिसरा आरोपी सुभम देशमुख यास पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले आहे.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सदरील घटनेबाबत एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले होते. सरकारी पक्षाची बाजू रमेश राजूरकर यांनी मांडली तर बचाव पक्षाची बाजू अॅडव्होकेट जेजे जाधव यांनी मांडली.