नांदेड - जिल्ह्यातील तरोडा (ता.हदगाव) येथील एका दाम्पत्याच्या प्रेमाला संशयाचे ग्रहण लागले आणि त्याचा शेवट दोघांचा जीव जाण्यात झाला. दोन पोरं आई-बाबांना पोरकी झाली आहेत. दोन कुटुंब आपल्या पाल्यांना गमावून बसली. ऐन दिवाळी सणात ही हृदयद्रावक घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
अनैतिक संबंधाच्या संशयातून टोकाची भूमिका -
सुभाष लक्ष्मण बोरकर व प्रेमिला यांनी घरच्या मंडळीचा विरोध पत्करुन पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. पळून गेल्यामुळे दोघांच्या घरचा विरोध, हाताला काम नाही अशा परिस्थितीत मित्रांच्या मदतीने औरंगाबाद गाठले व कंपनीत कामही मिळाले. दोघांचा संसार सुरु झाला व त्यांच्या संसारवेलीवर दोन फुलं झाली. लग्नानंतर पाच वर्षे सुखात गेल्यानंतर त्यांच्या प्रेमाला संशयाचे ग्रहण लागले. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय सुभाषला आला. त्यामुळे जिच्यासाठी घर सोडले, आई-बाबा सोडले तिने धोका दिल्याची शंका आल्याने सुभाषने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला.
सुभाषचा मृतदेह मिळाला मात्र पत्नी प्रेमिला मिळाली नव्हती. ती औरंगाबादला गेली असेल, की तिनेही सुभाषसारखे टोकाचे पाऊल उचलले असेल? अशी शंका व्यक्त केली जात होती. पण तिचा शोध लागला नाही. बाळापुर ठाण्याअंतर्गत भुवनेश्वरला सुभाषने आत्महत्या केल्याने तपास सुरु होता. दोन दिवसांनंतर भुवनेश्वर जवळील कॅनाल रस्त्यालगत प्रेमिलाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला.
दोन मुलं झाली पोरकी -
एक आठवड्यानंतर प्रेमिलाचा मृतदेह आढळला. प्रेमी युगलाचा करुण अंत झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. दोन मुलं आई-बाबांना पोरकी झाली तर दोन आई-बाबा दोन मुलांना (सुभाष प्रेमिला) पोरकी झाली आहेत.