नांदेड - कोरोना संसर्गाने धुमाकूळ घातल्यामुळे हातावर पोट असेल्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. नांदेड शहरात पालात राहणाऱ्या नागरिकांची तर प्रचंड उपासमार होत असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. या नागरिकांच्या मदतीला 'खाकी'तील माणुसकी धाऊन आली. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पालावरील नागरिकांना अन्नधान्य पुरवले.
किरकोळ वस्तूंची विक्री करत भटकंती करणाऱ्याचे सध्या हाल होत आहेत. संचारबंदीमुळे या नागरिकांना फाटक्या कपड्यांनी बांधलेल्या झोपडीबाहेर जाता येत नाही. त्यामुळे अशा गोरगरिबांची उपासमार होऊ नये, यासाठी नांदेडच्या वाहतूक शाखेने पुढाकार घेतला आहे. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी पालातील शेकडो कुटुंबांना अत्यावश्यक सर्वच वस्तूंचा पुरवठा केला आहे. नांदेड नायगाव मार्गावरील तुप्पा परिसरातील या कुटुंबांना संचारबंदी असेपर्यंत अन्नधान्य आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.