नांदेड - कोरोनामुळे नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील सर्व व्यवहार ठप्प आहेत. सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात हळदीची खरेदी-विक्री असते. पण, यावर्षी गेल्या पंधरा दिवसांपासून कुठलीच खरेदी विक्री नसून बाजार समितीच्या परिसरात शुकशुकाट आहे. हंगाम असतानाही दररोजची कोट्यवधीची उलाढाल थांबली आहे.
शेतमालाच्या वाहतुकीला बंदी नसली तरी प्रत्यक्षात मात्र कुठेही दळण-वळण चालू नसल्याचे चित्र आहे. दररोज दहा हजार पोत्यांची आवक-जावक होते. यंदा मात्र, केवळ आडत दुकानात कुठलीही आवक नसल्याचे चित्र आहे. नांदेड, हिंगोली, परभणी परिसरात मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पन्न घेतले जाते. राज्यातील सर्वात मोठे हळदीची बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. हळदीसह गहू, हरभरा, ज्वारी यांची आवकही बंद आहे. व्यापाऱ्यांकडे उलाढाल नसल्यामुळे दैनंदिन व्यवहारावर मोठा परीणाम झाला आहे. साहजिकच शेतकऱ्यांचा माल विक्री होत नसल्यामुळे त्यांना मोठी आर्थिक चणचण भासत आहे. शेतकरी वर्गही मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. मालाची आवक-जावक होत नसल्यामुळे हमालाच्या हातालाही काम नाही. हातावर पोट असणाऱ्या गरीबांचे मोठे हाल होत आहेत. एकंदरीत बाजार समितीच्या परीसरातील अवलंबून असणाऱ्या सर्वच घटकावर परीणाम झाला आहे.
हेही वाचा - नांदेडमध्ये सोशल डिस्टंसिंगची पायमल्ली, आरोग्य विभागातील विविध पदासाठी बेरोजगारांची तौबा गर्दी