नांदेड - देशभरात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढत असताना नांदेड तब्बल तीस दिवस कोरोनामुक्त होते. ग्रीन झोनमध्ये राहिलेल्या नांदेडमध्ये एकदा कोरोनाचा शिरकाव झाला आणि बघता बघता वीस-बावीस दिवसात नांदेडमध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येने शतक पार केले. मंगळवारी रात्री दहा वाजता प्राप्त झालेल्या रिपोर्टमध्ये आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे नांदेडमध्ये आता कोरोनाबाधितांची संख्या १०६ वर पोहोचली आहे.
मंगळवारी प्राप्त झालेल्या रिपोर्टपैकी १२४ रिपोर्ट निगेटिव्ह आले तर आठ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यात मंगळवारी सकाळी व रात्री १०.३० वाजता मिळून एकूण १६१ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ९ पॉझिटिव्ह तर १४६ अहवाल निगेटिव्ह आहेत. ९ अहवाल प्रलंबित आहेत.
मंगळवारी रात्री आढळलेले बाधित रुग्ण हे कुंभार टेकडी रुग्ण संपर्कातील ६ जण बाधित आहेत. तर करबला मृत रुग्णाच्या संपर्कातील दोन जण असून अबचल नगर रुग्ण संपर्कातील एक जण असे नऊ जण पॉझिटिव्ह असल्याचे समजते. नागरिकांनी सुरक्षित राहावे. अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ भोसीकर यांनी केले आहे.