नांदेड - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ( दि . १२ ) नव्या मोंढ्यातील मार्केट कमिटी मैदानावर सायंकाळी ५ वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेची संपूर्ण तयारी झाली असून या सभेकडे राजकीय निरिक्षकांसह मतदारांचेदेखील लक्ष लागले आहे.
राज ठाकरे काय बोलणार, कोणत्या उमेदवाराच्या आणि पक्षाच्या बाजुने आपल्या भाषणाचा कल ठेवणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा देशात कोठेही उमेदवार उभा केलेला नाही. आपल्या पक्षाचा पाठिंबा कोणालाही नाही. परंतु, देशात सध्या निर्माण झालेल्या स्थितीवर बोलण्याचा मला व माझ्या पक्षाला अधिकार असल्याचा दावा केला होता. त्याच अनुषंगाने राज ठाकरे यांनी राज्यातील निवडक ठिकाणी जाहीर सभा घेण्याचे मागच्या आठवड्यात जाहीर केले होते. मुंबईत गुढी पाडव्यादरम्यान त्यांची झालेली जंगी सभा चांगलीच गाजली होती. त्यानंतर त्यांनी राज्याचा दौरा सुरू केला असून आज त्यांची पहिली सभा नांदेडमध्ये होत आहे.