नांदेड - मनमाडहून सिकंदराबादकडे जाणाऱ्या 'अजिंठा एक्सप्रेस'ची वेळ बदलण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेने तीन दिवसातच मागे घेतला आहे. वृत्तपत्र विक्रेता संघटना, नांदेड क्षेत्रीय रेल्वे सल्लागार समिती, रेल्वे परिषद व प्रवासी संघटनेने या रेल्वेची वेळ बदलण्याला विरोध केला होता. त्यानंतर नांदेडचे खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी फोनवर चर्चा करून हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडले. त्यामुळे ही रेल्वे पूर्वीप्रमाणेच मनमाडहून रात्री ०८:५० वाजता सुटून नांदेडला पहाटे ३:०८ वाजता येणार आहे.
हेही वाचा - 'सरकार पोलिसांना पाठबळ देईल; मात्र, त्यासाठी पोलिसांनी स्वतः हिंमत दाखवावी'
मनमाडहून सिकंदराबादपर्यंत जाणारी ही रेल्वे येत्या १० जानेवारीपासून दररोज सायंकाळी ०४:४५ वाजता सोडण्याचे 'दमरे'ने तीन दिवसांपूर्वी जाहीर केले होते. या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले. सिकंदराबादहून मनमाडला दररोज सकाळी ६:४५ वाजता पोहोचणारी ही रेल्वे १४ तास तेथेच थांबून रात्री ०८:५० वाजता परतीच्या प्रवासाला निघते. त्याचा सदुपयोग घेण्यासाठी तसेच मराठवाड्यातून मुंबईला जाणाऱ्या वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन ही रेल्वे कल्याणपर्यंत वाढवण्याची मागणी होती. दहा तासात कल्याणहून परत येऊन कल्याण किंवा मनमाडला गाडीची देखभाल करणे शक्य होते. त्याचबरोबर मनमाडहून सकाळी ६:४५ ते ८:२० या दरम्यान, एकही रेल्वेगाडी मुंबईकडे धावत नसल्याने अजिंठा एक्सप्रेसला चांगला महसूल मिळेल, अशीही शक्यता आहे. परंतु, या गाडीच्या विस्तारात खोडा टाकण्याच्या उद्देशाने दक्षिण मध्य रेल्वेने मनमाडहून सिकंदराबादकडे परतणारी रेल्वे नियोजित वेळेच्या साडेतीन तास अगोदर सोडण्याचे वेळापत्रक जाहीर केले. यानुसार ही रेल्वे सुटली असती तर कल्याणपर्यंत विस्तार करण्याच्या मागणीला काहीच अर्थ राहिला नसता. तेलंगणासह मराठवाड्यातील अनेक प्रवासी या रेल्वेतून शिर्डीच्या दर्शनासाठी जाऊन याच गाडीने परतत होते. त्यांनाही दुसरी रेल्वेगाडी उपलब्ध होत नाही.
औरंगाबादहून अनेक विभागीय वृत्तपत्रे या रेल्वेगाडीने जालना, परभणी, नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी आणली जात होती. त्यामुळे या गाडीचा वेळ बदलल्यास सर्वांचीच गैरसोय होणार होती. याशिवाय औरंगाबादहून २ आणि नांदेडहून ३ रेल्वेगाड्या एकाच वेळेत चालवण्याचा अजब उपक्रम दक्षिण मध्य रेल्वेने आखला होता. परंतु, सर्वांच्या मागणीच्या पाठबळामुळे तसेच मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांचा आक्रमकपणा थांबवण्याच्या उद्देशाने दक्षिण मध्य रेल्वेने या रेल्वेगाडीच्या या वेळापत्रकात केलेला बदल रद्द केला असून, ही रेल्वे पूर्वीच्याच वेळेत अर्थात दररोज रात्री ०८:५० वाजता मनमाड येथून सुटून नांदेडला पहाटे ३:०८ वाजता तसेच सिकंदराबादला सकाळी ७:०० वाजता पोहोचेल असे स्पष्ट केले आहे.
'राज्यराणी एक्सप्रेस' १० जानेवारीनंतर -
बहूप्रतिक्षीत नांदेड- मनमाड-मुंबई राज्यराणी एक्सप्रेस १ जानेवारीपासून सुरू होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर केली जात होती. परंतु, तशी अधिकृत घोषणा झाली नाही. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून प्रयत्न सुरू होते. परंतु, काही तांत्रिक कारणांमुळे ही रेल्वे १० जानेवारीनंतर सुरू होईल, अशी माहिती रेल्वेच्या सुत्रांनी दिली. या रेल्वेगाडीच्या शुभारंभाबाबत रेल्वे विभागाने आपल्याशी संपर्क करून १० जानेवारीनंतरची आपली उपलब्धता विचारली असल्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले.