नांदेड - भोकरचे तीन पोलीस अधिकारी, १२ पोलीस कर्मचारी तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे ३ कर्मचारी, अशा १८ जणांना शासकीय रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. हे सर्व तेलंगाणातील कोरोनाबाधित ट्रक चालकाच्या संपर्कात आले होते. नांदेड जिल्ह्यातील भोकरच्या राज्य सीमेवर तपासणी करताना हे सर्वजण संपर्कात आले होते.
या सर्वांच्या घशाचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला जाणार असून दोन वेळा अहवाल येईपर्यंत सर्वांना रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यात आजवर पाठवलेल्या सर्व संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे, नांदेड जिल्हा अजून तरी पूर्णत: कोरोनामुक्त आहे.
नांदेड हे तेलंगाणा व कर्नाटक सीमेवर असल्याने जिल्ह्याबरोबरच राज्याच्याही सीमा सील करण्यात आल्या आहेत. बाहेरुन येणाऱ्या नागरिकांवर पोलिसांची करडी नजर आहे. तसेच जिल्हा सीमेवरुन केवळ अत्यावश्यक सेवांची वाहतूक करण्यास परवानगी आहे.
मागील आठवड्यात तेलंगाणातील करीमनगर जिल्ह्यातील आंबे घेऊन आलेला एक चालक भोकर येथील राज्य सीमा ओलांडून खामगावकडे गेला. तिथून याच सीमेच्या मार्गाने पुन्हा करीमनगरकडे परतला. भोकरच्या राज्य सीमेच्या चेक नाक्यावर नियुक्त केलेल्या आरटीओ अधिकारी व पोलिसांनी जाताना व येताना ट्रकची तपासणी केली होती.
हा ट्रकचालक करीमनगर येथे पोहोचल्यानंतर तीन चार दिवसांनी त्याला सर्दी, खोकला, घसादुखी, डोकेदुखी, ताप आणि श्वास घेण्यास त्रास सुरु झाला. लक्षणे दिसल्यानंतर त्याने तेथील शासकीय रुग्णालयात धाव घेऊन उपचार सुरू केले. तपासणीदरम्यान त्याला कोरोनाची बाधा असल्याचा अहवाल आला. त्यावरुन मागील १५ दिवसांच्या कालावधीत तो कोणाकोणाच्या संपर्कात आला, अशा लोकांची यादी काढण्याचे काम सुरु झाले. मालवाहतुकीचा व्यवसाय असल्याने तो ज्या मार्गाने गेला आणि जिथे थांबला, अशी सर्व माहिती त्याने स्थानिक प्रशासनाला दिली.
भोकर तालुक्यातील राज्य सीमेच्या रहाटी येथील चेक पोस्टवर जाताना व येताना त्याची तपासणी करणाऱ्या तब्बल १८ जणांची नावे समोर आली. या सर्वांना शासकीय रुग्णालयात तात्काळ क्वारंटाईन करण्यात आले आहे. सर्वांच्या घशाचा स्वॅब औरंगाबादच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला जाणार असून दोन वेळा रिपोर्ट निगेटीव्ह येईपर्यंत या सर्वांना रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे.