नांदेड - जिल्ह्यामध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. नागपूर महामार्गावर शुक्रवारी (दि.२० मार्च) रात्री अकरा वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना घडली. तर नांदेड-हिंगोली महामार्गावर टेम्पो दुचाकीच्या धडकेत दोन जण जागीच ठार झाले आहेत.
नागपूर महामार्गावर शुक्रवारी (दि.२० मार्च) रात्री अकरा वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना घडली. नांदेडच्या जुना कौठा भागात राहणारे कैलास गणपतराव साकरवाड दुचाकीवरून नांदेडहून उमरखेडला (क्र. एम.एच.२६ एक्स ४२४६)जात असताना हिवरा पाटीजवळ (ता.कळमनूरी) अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यावेळी कैलास गणपतराव साकरवाड हे गंभीर जखमी झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र डोंगरकडा येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती कळताच महामार्ग पोलिस प्रशासनाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख रहमान, रमाकांत शिंदे, दिपक जाधव, वसंत शिनगारे यांनी दवाखान्यात दाखल केले होते.
तर नांदेड- हिंगोली महामार्गावर वसमतफाटा नजीक दि.२० मार्च रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास टेम्पो व दुचाकीची सामोरा-समोर जबर धडक झाल्याने दोन जण जागीच ठार झाले आहेत.नांदेड हिंगोली महामार्गावर टेम्पो क्र एम एच २२-१६३७ व मोटार सायकल क्र एम एच १९ एबी २५१९ यांची समोरासमोर जबर धडक झाल्याने मोटार सायकल वरील पूजा बाबू पवार (वय-२६) रा.शिवाजीनगर पुणे व दुचाकीस्वार छोटू उर्फ संदीप पैठणे रा. फुलेनगर ता. परळी जि. बीड हे जागीच ठार झाले आहेत. सदरील दोघे नांदेडला दवाखान्यात जात असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी वसमत महामार्ग पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली.