नांदेड- कर्नाटक राज्यातील बिदर कारागृहातून पसार गुन्हेगार दोन साथीदारासह नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला आहे. संबंधित आरोपी हे गंभीर गुन्ह्यातील कुख्यात असून आणखी पाच गुन्ह्याची त्यांनी कबुली दिली आहे.
नांदेड जिल्ह्यात घडणाऱ्या घरफोडी, चोरी या गुन्ह्याचा मागावा घेत असताना, 13 जून रोजी देगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस पथकास गुप्त माहिती मिळाली. या माहितीवरुन, कर्नाटक राज्यातील बिदर करागृहातून पसार असलेला आणि गंभीर गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुन्हेगार नामदेव रामकिशन भोसले (रा.मंग्याळ तांडा ता.मुखेड) हा आणि त्यांचे दोन साथीदार भास्कर दादाराव चव्हाण (रा.जांभळी तांडा ता.मुखेड) व चाफरान पानबाबू भोसले (रा.निवघा बाजार ता.हदगांव) हे खानापूर परिसरात गुन्हे करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली होती.
पोलीस पथकाने सापळा रचून त्यांना पकडले. गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता, कुख्यात प्रमुख नामदेव भोसले हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेला व मागील काळात कर्नाटक राज्यातील बिदर करागृहातून पसार झालेला आरोपी असल्याची माहिती पुढे आली आहे. या तिन्ही आरोपींनी पोलीस ठाणे देगलूर, नायगांव व लोहा या हद्दीत घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. तसेच अधिकच्या तपासात त्यांच्याकडून बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. तिन्ही आरोपींना पुढील तपासासाठी देगलूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक रमाकांत पांचाळ, पोलीस हवालदार करले, सलीम, बालाजी तेलंग, अफजल पठाण, देवा चव्हाण, रवि बाबर, बालाजी यादगीलवार, पदमा कांबळे, शंकर केंद्रे व हेमंत बिचकेवार यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईतील पथकाचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर व अपर पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतूक केले आहे.