नांदेड - माहूर शहरापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असणारा बाबा शेख फरिद येथील धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. पावसामुळे आता धबधबा कोसळण्यास सुरुवात झाली आहे. या धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देत असतात. मात्र, यावर्षी आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे पर्यटकांनी या धबधब्याकडे पाठ फिरवली आहे.
माहूर येथील रेणुका मातेच्या मंदिरापासून अगदी आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या शेख फरीद बाबा येथील निसर्गनिर्मित धबधबा यंदा ओसंडूवन वाहत आहे. एरवी पर्यटकांना खुणावणाऱ्या या धबधब्याकडे यंदा मात्र पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी असल्याने परिसकातच शुकशुकाट आहे. मात्र, गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसाने हा धबधबा अल्पवधीतच लुप्त झाला होता. मात्र गेल्या आठ ते दहा दिवसाच्या संततच्या पावसाने हा धबधबा आता ओसंडून वाहत आहे.
वझरा येथील शेख फरीद बाबा दर्ग्यात तेंलगणा, मराठवाडा, विदर्भातून भाविक दर्शनासाठी येतात, यासोबतच अनेक पर्यटक येथील निसर्गनिर्मित धबधबा पाहण्यासाठी गर्दी करत असतात. मात्र, यावर्षी कोरोनामुळे मागील चार महिन्यापासून दर्गा बंद असल्याने भक्तांसह पर्यटकांनी देखील इकडे पाठ फिरवली आहे. माहूर तालुक्याला निसर्गाने एक वेगळे वरदान दिले आहे, उंच डोंगर आणि हिरव्यागार झाडांनी नटलेला परिसर, डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या धबधबा या भागात आहे. त्यामुळे शासनाने निधी उपलब्ध करून देऊन या ठिकाणी उद्यान निर्माण करण्यात यावे, अशी मागणी आता येथील नागरिक करीत आहेत.