नांदेड - जिल्ह्यात संथगतीने सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या कामासंदर्भात अनेक तक्रारी देखील दाखल झाल्या आहेत. आता राष्ट्रीय महामार्गाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करावे, अशी मागणी होत आहे. नांदेड काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी ही मागणी केली आहे.
केंद्रीय रस्ते विकासमंत्री यांच्या दूरदृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाले आहेत. त्यात उस्माननगर-हाळदा-मुखेड-कुंद्राळ (NH161A) या महामार्गाला देखील मान्यता दिली. दोन वर्षांपूर्वी या कामाचा शुभारंभ देखील झाला. मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे विकास कामे संथ गतीने होताना दिसत आहेत. मागील दोन वर्षांपासून रस्त्याचे खोदकाम झाले आहे. अद्याप रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. अनेकवेळा या मार्गावरील पर्यायी पूल पावसात वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिकांना प्रवास करताना मोठ्या कसरती कराव्या लागत आहेत.
प्रगतीपथावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गाची कामे सार्वजनिक विभागाकडून (पीडब्ल्यूडी) करावीत, अशी मागणी आता जोर धरत आहे. जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी ही मागणी केली आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा करणार असल्याचे देखील ते म्हणाले.