नांदेड- मुलांचे भावविश्व हे झपाट्याने बदलत जात आहे. मुलं दिवसेंदिवस एकलकोंडी होत आहेत, घरादारापासून तुटत आहेत, पौगंडावस्थेतील आणि किशोरवयीन मुलांचे प्रश्न हे आस्थापूर्वक समजून घेण्याची आवश्यकता आहे. अशा काळात बालसाहित्याकडे अत्यंत गांभिर्याने पाहिले पाहिजे आणि बालसाहित्य निर्मितीकडे जाणिवपूर्वक वळले पाहिजे. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध नाटककार आणि मराठवाड्यात बालरंगभुमीची चळवळ उभे करणारे बालसाहित्यिक सूर्यकांत सराफ यांनी केले.
भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुल आणि साहित्य अकादमी यांच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘मराठी बालसाहित्य’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाचे उद्घाटन सूर्यकांत सराफ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सराफ यांनी यावेळी मराठी बालसाहित्य आणि आजचा बालक यांच्यातील वाढते अंतर दूर झाले पाहिजे असेही सांगितले. आबा महाजन यांनी आपल्या बीजभाषणात मराठी बालसाहित्याची सद्यस्थिती मांडली. महाराष्ट्रात स्वतंत्र बालसाहित्य अकादमी असावी अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली. बोलीभाषा आणि विज्ञानसाहित्यांकडे लक्ष देण्याची गरज महाजन यांनी बोलून दाखवली.
कुलगुरु डॉ. भोसले यांनी बालसाहित्यावर परिसंवाद आयोजित केल्याबद्दल संयोजकांचे अभिनंदन केले. बदलत्या कुटुंब व समाजव्यवस्थेमध्ये बालक, पालक यांना उपयुक्त साहित्य निर्माण झाले पाहिजे असे कुलगुरु डॉ उद्धव भोसले अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले.
निबंधवाचन सत्रामध्ये डॉ. केशव सखाराम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एकनाथ आव्हाड, डॉ. पृथ्वीराज तौर आणि निवेदिता मदाने यांनी निबंध वाचले. साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार प्राप्त लेखक सलीम मुल्ला आणि सुभाष विभुते यांचे शोधनिबंध डॉ. विनायक येवले आणि डॉ. पी. विठ्ठल यांनी वाचून दाखवले.
परिसंवादाचे स्वागतपर भाषण साहित्य अकादमीचे प्रादेशिक सचिव कृष्णा किंबहूने यांनी केले. पृथ्वीराज तौर यांनी सूत्रसंचालन तर डॉ दिलीप चव्हाण यांनी आभार मानले.यावेळी कुलगुरु डॉ. उद्धव भोसले, सूप्रसिद्ध कवी आबा महाजन, साहित्य अकादेमीचे प्रादेशिक सचिव कृष्णा किंबहूने, भाषा संकुलाचे संचालक डॉ दिलीप चव्हाण, डॉ पृथ्वीराज तौर,चर्चासत्राला डॉ. सुधीर कोकरे, डॉ. सूरेश सावंत, डॉ अशोक कदम, डॉ सूरेखा मुंगल, पार्थ बावस्कर, महेश मोरे, शं. ल. नाईक, बबन शिंदे, लक्ष्मण मलगिरवार, शिवाजी आंबुलगेकर, प्रतिक्षा तालंगकर, पांडूरंग पुठ्ठेवाड, शेषेराव जाधव, डॉ संजय कसाब, डॉ महेश जोशी, अजय दर्शनकार यांच्यासह बालसाहित्यिक, अभ्यासक, प्राध्यापक उपस्थित होते.