नांदेड - चाळीस-चाळीस वर्षे जनतेची सेवा करून आम्हाला पदे मिळाली आहेत. आमदार-खासदार कुंड्यातील झाडाप्रमाणे उगवत नाहीत. त्यासाठी जनतेच्या सेवेत राहावे लागते. जनतेच्या शिव्या खाव्या लागतात. नाहीतर कुणीही कुंड्या लावून आमदार-खासदार उगवले असते. हिंगोली लोकसभा मतदारसंघात लोकांची कामे करणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या, असे प्रतिपादन माजी केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी केले.
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे भाजप-शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ निमगाव (ता. अर्धापूर) येथे जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. मी पहिल्यांदाच शिवसेनेसाठी मत मागत आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी दिलेला उमेदवार सुशिक्षित असून तो लोकांच्या कामी येणारा आहे. चाभरा येथील कै. शंकरराव चव्हाण यांचा पुतळा गेल्या पाच वर्षांपासून तयार असून सुद्धा त्याचे अनावरण होत नाही. हे चुकीचे आहे. त्याच्या सर्व परवानग्या काढून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करूयात, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी आमदार नागेश पाटील बोलताना म्हणाले की, 'मातोश्री' चे उंबरठे झिजवून थकला. त्याला कुठेच थारा मिळाला नसल्यामुळे काँग्रेसमध्ये गेला आहे. हा संधी-साधू उमेदवार आहे. मतदारांनो त्याला त्याची जागा दाखवा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे, दत्ता पाटील पांगरीकर, माजी सभापती दिलीपराव देबगुंडे आदी उपस्थित होते.