नांदेड - नदीपात्रात अडकलेल्या दोन तरुणांना वाचवण्यासाठी एक उपविभागीय अधिकारी स्वत: नदीपात्रात उतरले. दोरीच्या साहय्याने त्या दोन्ही तरुणांची सुखरूप सुटका करण्यात आली.
जनावरे चारणारे दोन तरुण नदीपात्रात अडकले
भोकर तालुक्यातील जामदरी येथील 19 वर्षीय अर्जुन तम्मलवाड आणि 18 वर्षीय धम्मपाल कसबे हे दोघे जनावरे चारण्यासाठी गावालगतच्या नदीपलीकडे गेली होती. पाण्याचा प्रवाह कमी असताना दुपारी दोन वाजता जनावरे घराकडे परत गेली. मात्र हे दोन्ही तरूण नदीपात्रात असलेल्या उंच टेकड्यांवर बसले होते. तेवढ्यात दोन्ही बाजूने पाण्याचा प्रवाह वाढला. थोड्या वेळाने पाण्याचा प्रवाह कमी होईल असे या तरूणांना वाटले. मात्र सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाणी पुन्हा वाढले. साईनाथ आणि धम्मपाल हे दोन तरूण पाण्याने वेढलेल्या नदीपात्रात अडकले.
उपविभागीय अधिकारी यांनी नदीपात्रात मारली उडी
हि बाब भोकर तहसील कार्यालय आणि नांदेड येथील आपत्ती व्यवस्थापन पथकास कळवण्यात आली. काही वेळात उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे आणि तहसीलदार भरत सुर्यवंशी हे टिमसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची परीस्थिती आणि पथकास वेळ असल्याने उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांनी स्वत: म्हैसा रोड मार्ग जावून नदीपात्रात उडी मारली. मात्र पाणी अधिक असल्याने आत जाणे शक्य नव्हते. रात्र होत असल्याने आणि पाणी वाढत असल्याने लवकर काही कारणे गरजेचे होते. तेंव्हा डौरमार्ग जामदरीकडे जावून दोरीच्या सहाय्याने खंदारे नदीपात्रात उतरले. उपविभागीय अधिका-यांची हिम्मत पाहून गावातील प्रदिप पोटे, आत्माराम आतपलवाड, सचिन कसबे, भिमराव हातगळे हे सुद्धा नदीपात्रात गेले.
दोरीच्या साहय्याने सुखरूप काढले बाहेर...
दोरीच्या साहय्याने पकडून अडकलेल्या अर्जुन तम्मलवाड आणि धम्मपाल कसबे या दोन तरुणांना सुखरूप बाहेर काढन्यात आले.. उपविभागीय अधिका-यांनी बचाव पथकाची वाट न पाहता दाखवलेल्या या धाडसाचे कौतुक होत आहे.