नांदेड - महापरीक्षा पोर्टल बंद करून सरळसेवा नोकरभरती सुरू करावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर विद्यार्थी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
हेही वाचा... नगराध्यक्ष अन् सरपंच जनतेतून थेट निवडण्याची पद्धत होणार रद्द..
सध्या राज्यात नोकरभरती बंद आहे. त्यामुळे उच्चशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महापोर्टलअंतर्गत नोकरभरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविले जात आहेत. परीक्षादेखील ऑनलाईन पद्धतीनेच घेतली जात आहे. त्यामुळे यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि गोंधळ होत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर या परीक्षा रद्द करून सरळसेवा भरती सुरू करण्याची मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे.
हेही वाचा... 'अच्छे दिन'बद्दल विचारल्यावर तुमची बोबडी का वळते? ; युती तुटली म्हणजे आम्ही धर्मांतर केले नाही
राज्यसेवा पूर्व परीक्षा पद्धतीत बदल करून सीएसटी विषयाचा पेपर युपीएसस्सीच्या धर्तीवर करण्यात यावा, शिक्षक आणि प्राध्यापकांची भरती प्रक्रिया केंद्राच्या धर्तीवर राज्यात आयोग नेमून करण्यात यावी, पोलीस भरतीसुद्धा पुर्वीप्रमाणेच करावी, आदी मागण्या राज्य स्पर्धा परीक्षा संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आल्या आहेत. सोमवारी सकाळी आयटीआय चौकातील महात्मा फुले पुतळ्यापासून विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला.