नांदेड- कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने अचानकपणे २४ मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर केले. यानंतर परप्रांतीय मजूर ठिकठिकाणी अडकून पडले होते. नांदेड जिल्ह्यात अडकलेल्या उत्तर प्रदेशच्या १४६४ मजुरांना बुधवारी विशेष श्रमिक रेल्वेने जिल्हा प्रशासनाने त्याच्या राज्याकडे रवाना केले.
मागील दीड-पावणे दोन महिन्यापासून हे परप्रांतीय मजूर नांदेडमध्ये अडकून पडले होते. गुरुद्वारा दर्शनासाठी आलेल्या पंजाबच्या भाविकांना केंद्र सरकारच्या मदतीने पंजाबकडे रवाना करण्यात आले होते. मात्र,परप्रांतीय मजूर नांदेडमध्ये अडकून होते. या मजुरांच्या निवासाची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने वेगवेगळ्या मंगल कार्यालय, शाळा, विद्यार्थ्यांचे होस्टेल अशा ठिकाणी केलेली होती. या मजुरांना विविध स्वयंसेवी संस्थांच्या वतीने दोन वेळच्या जेवणाची, चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तरीही हे मजूर आपल्या गावाकडे जाण्यासाठी आतूर होते. अखेर जिल्हा प्रशासनाने उत्तरप्रदेश सरकारची परवानगी मिळाल्यानंतर १४६४ मजुरांना विशेष श्रमिक रेल्वेने बुधवारी संध्याकाळी चार वाजता रवाना केले.
मजुरांना नांदेड, कंधार, बिलोली, मुखेड,धर्माबाद, अर्धापुर, माहूर, आदी तालुक्यातून रेल्वे स्टेशन परिसरात सकाळपासूनच एकत्रित करण्याचे काम सुरू होते. कंधार मधून सुमारे चार बसेस मधून हे परप्रांतीय मजूर नांदेड रेल्वे स्थानकात दाखल झाले. नांदेड शहरातील श्रीकृष्ण मंगल कार्यालय येथे अडकलेले ८२ मजूर वेगवेगळ्या वाहनांनी रेल्वे स्थानकावर पोहोचले होते.
रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी व फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जावे म्हणून प्रशासन प्रयत्न करीत होते. रेल्वे स्थानकात गर्दी वाढत असल्याने या परप्रांतीय मजुरांना रेल्वे स्थानकासमोरील गुरुद्वारा बोर्डाच्या मोकळ्या जागेत बसविण्यात आले. या मजुरांसाठी जेवणाचे सामान, सॅनिटायझर, बिस्किट आदी गरजेच्या वस्तू देण्यात आल्या. आपापल्या गावाकडे जायला मिळत असल्याने या परप्रांतीय मजुरांनी समाधान व्यक्त केले. मागील दीड-पावणे दोन महिन्यापासून नांदेडकरांनी केलेल्या पाहुणचाराबद्दलही या मजुरांनी नांदेडकरांचे आभार व्यक्त केले.