नांदेड - शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगली बाजारपेठ प्राप्त व्हावी, दक्षिण मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दक्षिण मध्य रेल्वेने 5 जानेवारीपासून महाराष्ट्रातून पहिली किसान रेल्वे सुरू केली आहे. किसान रेल्वेतून कांद्याने भरलेला प्रारंभिक रॅक नांदेड विभागातील नगरसोल ते गुवाहाटीपर्यंत जाणार आहे.
नांदेड विभागातील पहिली किसान रेल्वे सुरू झाली आहे. कृषी क्षेत्राच्या मार्केटींगकरिता अडथळेमुक्त, सुरक्षित व जलद वाहतूक सेवा उपलब्ध करून देताना कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढविण्यासाठी किसान रेल्वे केंद्र सरकारने सुरू केली आहे.
हेही वाचा-100 वी किसान रेल्वे सांगोल्यातून बंगालच्या शालीमारपर्यंत; पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा
रेल्वे वाहतुकीत 50 टक्के सवलत-
शेतकऱ्यांना आणखी प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने 'ऑपरेशन ग्रीन्स – टी.ओ.पी. टू टोटल'च्या अंतर्गत किसान रेल्वेंद्वारे अधिसूचित फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर 50 टक्के वाहतूक दरात सवलत देण्याची घोषणा केली. त्या अनुषंगाने दक्षिण मध्य रेल्वेच्या महाराष्ट्रातील प्रथम किसान रेल्वेलाही कांद्याच्या वाहतुकीसाठी 50 टक्के सवलत देण्यात आली आहे.
हेही वाचा-'किसान रेल्वे' योजनेच्या लाभापासून मराठवाड्यातील शेतकरी वंचीत
मालवाहतूक करणे होते कठीण-
मालगाड्यांमधून नगरसोल स्थानकातून कांद्याची लोडिंग अधूनमधून होत असते. तथापि, या कांद्यांची मालगाड्यांमधून वाहतूक करण्याकरिता शेतकरी व व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात माल खरेदी करावा लागत होता. जेणेकरून संपूर्ण रेल्वे भार क्षमता (पूर्ण ट्रेन लोड क्षमता) पूर्ण होऊ शकेल. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर माल गोळा करण्याकरीता खूप जास्त मालवाहतुकीच्या साधनांची आवश्यकता लागत होता. मालवाहतूक करणाऱ्या ग्राहकांसाठी हे एक कठीण काम होते.
शेतकरी व व्यापाऱ्यांची बैठक
नांदेड विभागाच्या मालवाहतूक टीमने शेतकरी व व्यापारी समुदायाशी नियमित बैठक घेतली. या बैठकीमध्ये शेतमालाची वाहतूक किसान रेल्वेने मालगाडीच्या तुलनेत अधिक सुलभतेने व कमी खर्चात करता येईल याविषयी माहिती देण्यात आली. तसेच किसान रेल्वेच्या इतर सुलभ फायद्यांविषयी माहिती देण्यात आली आहे.
जास्तीत गाड्या चालविण्यावर भर
नांदेड मालवाहतूक टीमच्या प्रयत्नांमुळे किसान रेल्वे सुरू झाली आहे. शेतकरी तसेच व्यापारी या सुविधामार्फत जास्तीत जास्त गाड्यांचा भार घेण्यास मालवाहतूक वापर करण्यास इच्छुक असल्याचे दर्शवित आहेत.
अशी धावणार रेल्वे-
नांदेड विभागातील पहिली किसान रेल्वे 5 जानेवारीला नगरसोल स्थानकहून फलाट क्र. 01 वरून सायंकाळी साडेपाच वाजता निघाली. या किसान रेल्वेमध्ये प्रत्येकी 23 टन क्षमतेच्या 22 पार्सल व्हॅन आहेत. ही गाडी 50 तासांच्या अल्प कालावधीत 2, 500 किमी अंतर पार करून सुमारे 522 टन कांद्याच्या माल घेवून दिनांक 7 जानेवारी रोजी रात्री साडेवाजता गुवाहाटी गुड्स कॉम्प्लेक्सवर, आसाममध्ये पोहोचेल.
मालवाहतूक वाढवण्यात हातभार लावावा- गजानन मल्ल्या
अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी नगरसोल स्थानकातुन यशस्वीपणे किसान रेल सुरु करण्याकरिता केलेल्या प्रयत्नाबद्दल आनंद व्यक्त केला. शेतकरी आणि व्यापारी यांनी किसान विशेष रेल्वे करिता अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालया मार्फत दिल्या जाणाऱ्या विशेष सवलती, संधी आणि सुविधा वापरून आपला व्यवसाय वृद्धिंगत करावा. तसेच दक्षिण मध्य रेल्वे ची मालवाहतूक वाढवण्यात हातभार लावावा. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी केले आहे.