नांदेड - घरगुती कारणावरून पोटच्या मुलानेच तीक्ष्ण हत्याराने वार करुन पित्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना हदगाव तालुक्यातील माटाळा येथे घडली. हरिभाऊ नामदेव दामोदर (वय - ५५) असे मृताचे नाव आहे.
माटाळा येथील गावातील हरिभाऊ दामोदर यांचा मुलगा बालाजी हरिभाऊ दामोदर याच्याशी घरगुती कारणावरून वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की बालाजी याने पिता हरिभाऊ दामोदर यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने छातीत चार वार केले. या हल्ल्यात हरिभाऊ गंभीर जखमी झाल्याने त्यांना शिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात येण्याआधीच मृत्यू झाल्याचे सांगितले.
हेही वाचा - धक्कादायक..! कोरोनाबाधित 8 वर्षीय चिमुकलीने मुंबईवरून बुलडाण्यापर्यंत परवानगीने केला प्रवास
याप्रकरणी माटाळा गावाचे पोलीस पाटील गंगाधर जामगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बालाजी दामोदर याच्याविरुद्ध हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. हदगाव पोलीस ठाण्याचे अवधून कुशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक फोलाने यांनी ही कारवाई केली. तर पुढील तपास सुरू आहे.