नांदेड : जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील काही गावांनी तेलंगणात जाण्याची मागणी केल्यानंतर आता बाजूच्या बिलोली तालुक्यात देखील तेलंगणात जाण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे. आज बिलोली येथील कार्ला गावात सीमावर्ती प्रश्न समन्वय समितीच्या वतीने घोषणाबाजी करण्यात आली. तेलंगणाच्या धर्तीवर विकास करा किंवा तेलंगणात जाऊ द्या, अशा घोषणा गावकऱ्यांनी ( Demanded to go to Telangana ) दिल्या आहेत.
सीमावर्ती गावात संवाद यात्रा - दरम्यान, सीमावर्ती समन्वय समितीच्यावतीने येत्या 5 डिसेंबर पासून संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. देगलुर , बिलोली आणि धर्माबाद या तीन तालुक्यातील सीमावर्ती गावात ही संवाद यात्रा जाणार आहे. तेलंगणा आणि आपल्या गावातील विकासाची तुलनात्मक बाजू गावकऱ्यांना समजावून त्यांना तेलंगणात जाण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. या सीमावर्ती प्रश्न समन्वय समितीच्या संवाद यात्रेमुळे तेलंगणात जाण्याची सीमावर्ती गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. शिवाय पुढच्या काळात आंदोलने देखील तीव्र होण्याची शक्यता आहे.
तेलंगणाच्या मंत्र्यांना भेटून मागणी - पाच वर्षापूर्वी देखील धर्माबादच्या तब्बल चाळीस गावांनी तेलंगणात जाण्याची मागणी केली होती. तेव्हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना बोलवून समस्या जाणून घेतल्या होत्या. गावातील विकासाकडे शासन लक्ष देत नसल्याने आता पुन्हा तेलंगणात जाण्याची मागणी होत आहे. धर्माबाद तालुक्यातील बन्नाळी येथील सरपंच तथा सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण निदानकर यांनी अनेक गावांच्या सरपंचांसोबत तेलंगणातील बासर येथे जाऊन तेलंगणाच्या एका मंत्र्याला भेटुन ही मागणी केली. आपल्या मागणीला 25 गावांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला. तेलंगणात शेतकरी, महीला, वृध्द व विधवांसाठी चांगल्या योजना आहेत. शिवाय गावांचा विकास देखिल झाल्याने ही मागणी करत असल्याचे गावकरी सांगत आहेत.