नांदेड - बी.एस.एफ.चे जवान गणेश चव्हाण यांना आज (मंगळवारी) अखेरचा निरोप देण्यात आला. जवान गणेश यांचे पार्थिव चाकूर येथील बीएसएफ कॅम्पवरून सकाळी दहा वाजता कुरुळा येथील त्यांच्या घरी आणण्यात आले. जवान गणेश चव्हाण यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कंधार तालुक्यातील कुरुळा गावातील गणेश चव्हाण हा सीमा सुरक्षा दलात मेघालय राज्यातील ढोबासीपादा इथे कर्तव्यावर होते. गणेश चव्हाण हे बालवयापासूनच खिलाडू वृत्तीचे होते. त्यांना हॉलीबॉल खेळात आवड होती. भारतीय सैन्यात जाण्याची त्यांची इच्छा होती. 1998 मध्ये त्यांची बीएसएफमध्ये भरती झाले होते.
गणेश चव्हाण यांचे पार्थिव कुरुळा गावात आल्यानंतर संपूर्ण परिसर भारत माता की जय च्या जयघोषाने दुमदुमून निघाले. गावात ठिकठिकाणी त्यांना श्रद्धांजली देणारे बॅनर लावण्यात आले होते. यावेळी महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि बीएसएफकडून सलामी देण्यात आली. गणेश चव्हाण यांच्या अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यांच्या पाश्चात त्यांचे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, बहिणी आणि भावंडे, असा मोठा परिवार आहे.
हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.29 टक्के; 101 नवे पॉझिटिव्ह, पाच जणांचा मृत्यू