नांदेड - शीख धर्मात दसरा हा सण पारंपरिकपणे साजरा करण्याची प्रथा असून कालपासून (१७ ऑक्टोबर) तख्त सचखंड श्री. हजूर साहेब येथे विधिवतपणे श्री. चंडी साहेब पाठ प्रारंभ करण्यात आला. दसऱ्याच्या दिवशी दुपारी चंडीसाहेब पाठाचे धार्मिक प्राथेनुसार समारोप होईल.
शीख धर्मात दसरा सण श्रद्धाभावाने साजरा होतो. विशेष म्हणजे, नांदेड येथील धार्मिक स्थळ, तख्त सचखंड श्री. हजूर साहेब येथे 'हल्ला महल्ला' सण वर्षानुवर्षे प्रथेनुसार नऊ दिवस साजरा होतो. नऊ दिवस सतत श्री. दशमग्रंथ साहेब अंतर्गत चंडीदी वार, म्हणजेच शक्तीच्या विविध अवताराच्या स्तुतिचे वर्णन आणि दसरा सणाचे ऐतहासिक महत्व पाठद्वारे प्रसारित करण्यात येते. त्यानुसार शनिवारी महोत्सवाला प्रारंभ झाला. काल सायंकाळी तख्त सचखंड हजूर साहेब येथे पाठ सुरू करण्यात आला.
गुरुद्वारा शीख छावनी, गुरुद्वारा मातासाहेब देवाजी, गुरुद्वारा शहीद नगर, बुंगा बंजारगाह, अबचलनगर आदी स्थानावर श्री. चंडीसाहेब पाठ सुरू करण्यात आला. अनेक शीख कुटुंबीयांच्या घरीसुद्धा श्रद्धाभावाने पाठ आयोजित करण्यात येते. दरवर्षी नांदेडमध्ये दसरा सण साजरा करण्यासाठी बाहेरून जवळपास २ लाख भाविक दाखल होतात. पण, या वर्षी कोरोना संक्रमण असल्याने बाहेरून भाविकांचे आगमन कमीच असणार आहे.
हेही वाचा- नवरात्री विशेष : उंच पर्वतरांगात भक्तांना प्रफुल्लित करणारा रेणुकादेवीचा माहूरगड...!