नांदेड : 'अजित पवार यांच्या रूपात शिंदे गटांच्या वाट्याला नको असणारी सासू आली आहे. तसेच राष्ट्रवादीमुळे हिंदुत्व धोक्यात आले असे म्हणत बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटाने राजकीय नीतिमत्ता गमावलीय का?', असा सवाल शिवसेना उद्धव गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्याचबरोबर केंद्रातील भाजप नेतृत्व देवेंद्र फडवणीस यांना साईडलाईन करते आहे का?, अशी शंकाही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केली आहे. त्या नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या.
'16 आमदारांचा विषय संशोधनाचा' : सुषमा अंधारे म्हणाल्या की, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची स्थगिती उठली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता अजित पवार यांची तिकडे एन्ट्री झाली आणि 16 आमदारांच्या निलंबनाबद्दल चर्चा सुरू झाली. इतके दिवस मिलिंद नार्वेकर असे सांगत होते की, मला कोणीही सांगू शकत नाही. मी वाटेल त्या वेळेला निर्णय घेईल. आम्ही तेव्हा सांगत होतो की, निर्णयाला किती वेळ लागेल हे स्पष्ट सांगितलेलं आहे. के. ई. शामचंद्र मेघसिंह विरुद्ध मणिपूर राज्य खटल्यात तीन महिन्याच्या आत निर्णय घ्यावा असे म्हटलेले असताना सुद्धा नार्वेकरांनी उद्दामपणे तसे म्हणणे वाईट होते. परंतु किमान या निमित्ताने सुप्रीम कोर्टाने दोन आठवड्याचा निर्णय दिला. आता नार्वेकर काय निर्णय घेतील हा तसा संशोधनाचा विषय आहे, असे त्या म्हणाल्या.
फडणवीसांचं महत्व कमी झालं : सुषमा अंधारे पुढे बोलताना म्हणाल्या की, 'मंत्रीमंडळात देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय अंतिम असेल असे मला वाटत नाही. मंत्रीमंडळाचा कणा अर्थ खाते आहे. यामध्ये देवेद्र फडणवीस यांचा कुठलाही हस्तक्षेप असणार नाही. तसेच या आधी जेव्हा कधी मंत्रिमंडळाचे विस्तार झाले, त्या आधी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते. परंतु आता अजित पवार एकटेच दिल्लीला गेले. यावरून देवेंद्र फडणवीसांचं महत्व कमी झालं आहे', अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली. तसेच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे पद गेल्याचं वाईट वाटलं, मात्र यापुढे अनेक मोठे झटके बसतील, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
हेही वाचा :