नांदेड – कोरोना महामारीतही अनेक सामाजिक उपक्रमांना मदत करणारी नांदेड येथील गुरुद्वारा सचखंड बोर्ड संस्था अडचणीत सापडली आहे. आहे. या संस्थेचा खर्च भागवण्यासाठी शंभर कोटींची आर्थिक मदत अनुदानाच्या स्वरूवात करावी, अशी मागणी शीख बांधवांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
गेल्या पाच महिन्यांपासून गुरुद्वारा संस्थेचे प्रति महिना नऊ ते दहा कोटी रुपयांचे उत्पन्न कमी झाले आहे. यापुढे पाच-सहा महिने अशीच परिस्थिती राहणार आहे. त्यामुळे गुरुद्वाराला या आर्थिक वर्षात भाविकांकडून पुरेसे दान मिळणार नसल्याचे स्पष्ट चित्र आहे.
प्रति महिना तीन कोटी रुपये खर्च-
गुरुद्वाराचा सर्व कारभार दानपेटी आणि इतर स्वरुपातून मिळणाऱ्या दानावर अवलंबून आहे. संस्थेकडे शहर आणि लगतच्या परिसरात दहा ते बारा गुरुद्वारांचे नियोजन आणि व्यवस्थापन आहे. गुरुद्वारांच्या नियोजन, सुरक्षा, वीज बिल, पाणी, लंगर व अन्य सुविधांसाठी प्रति महिना कोट्यवधी खर्च येतो. तसेच संस्थेत कार्यरत असलेल्या दीड हजार कर्मचाऱ्यांच्या पगारावर प्रति महिना तीन कोटींचा खर्च होतो. गुरुद्वारांच्या वेगवेगळ्या आठ ते दहा यात्री निवासांच्या व्यवस्थेसाठी मोठा खर्च करण्यात येतो.
गुरुद्वाराचे वातानुकूलित एनआरआय यात्री निवास, पंजाब भवन वातानुकूलित यात्री निवास सरकारने कोविड-१९ उपचार केंद्र म्हणून ताब्यात घेतले आहेत. त्यासाठीच्या व्यवस्थापनावर मोठा खर्च होत आहे. याचबरोबर दैनंदिन पूजापाठ, लंगर व सुरक्षा आदींवर कोट्यवधींचा खर्च होत आहे. यामुळे गुरुद्वारा सचखंड बोर्ड संस्थेला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहे.
धार्मिक व सामाजिक उपक्रमात गुरुद्वारा संस्थेचे भरीव योगदान
गुरुद्वारा संस्था अनेक धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवित आहे. महामारीतदेखील लाखो गरिबांना घरपोच लंगर सेवा देण्यात आली आहे. समाजातील गरीब व गरजूंना तीन ते चार महिन्यांचे रेशन वितरित करण्यात आले. तसेच वैद्यकीय सेवांचा पुरवठा करण्यात आला. संस्थेकडून शैक्षणिक उपक्रम सतत सुरू असतात.
नेहमीच सरकार आणि जनतेला मदत करणाऱ्या या संस्थेला बिकट आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने शंभर कोटींचे आर्थिक अनुदान मदत स्वरुपात द्यावेत, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर स. लखनसिंघ लांगरी, स. मनबीरसिंघ ग्रंथी, स.गगनदीपसिंघ रामगडिया, स. जोगिंदरसिंघ सरदार, स.गुरमीतसिंघ टमाना व सरताजसिंघ सुखमनी आदींच्या सह्या आहेत. हे निवदेन उपमुख्यमंत्री अजित पवार, नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार हेमंत पाटील, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, नांदेडचे जिल्हाधिकारी तथा गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष भूपिंदरसिंघ मिनहास यांना पाठविण्यात आले आहे.