नांदेड: कारेगाव गावात स्मशानभूमीसाठी जागेचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. गावाकऱ्यांकडून वेळोवेळी निवेदने देण्यात आली. अनेकवेळा धर्माबाद तहसील कार्यालयासमोर आंदोलन आणि उपोषण देखील करण्यात आले होते; मात्र प्रशासनाकडून केवळ खोटी आश्वासने दिली जात होती. मागणीची कुठलीच दखल घेतली जात नसल्याने गावकऱ्यांकडून आत्मदनाचा इशारा देण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न: सोमवारी सकाळी कारेगाव येथील जवळपास 20 ते 30 गावकरी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. यावेळी 4 ते 5 जनांनी सामूहिकरित्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली. येथे ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळीच आत्मदहन करू पाहणाऱ्या गावकऱ्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांकडून बळाचा वापर: कारेगाव येथील आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दरम्यान आत्मदहन करणाऱ्या दिगंबर गजराम झपाटे, मारोती मोहन झपाटे, देवराव केरबा सोनकांबळे, सुनील नामदेव उचलवाड, श्याम दिगंबर पिंगळे आदींना ताब्यात घेतले आहे.
स्मशानभूमीसाठी उपोषणही केले, पण...: कारेगाव गावात स्मशानभूमीसाठी जागेचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. अनेकवेळा धर्माबाद तहसील कार्यालयासमोर आंदोलन आणि उपोषण देखील करण्यात आले; पण प्रशासनातर्फे कुठलीच दखल घेतली न गेल्यामुळे नागरिकांनी सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. अनेक दिवसांपासून केल्या जाणाऱ्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच कारेगावातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याची प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिली.
विजेचे कनेक्शन तोडल्याचा निषेधार्थ आत्मदहनाचा प्रयत्न: पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थांचे आणि शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन तोडल्याचा निषेधार्थ गावकऱ्यांनी मार्च, 2022 रोजी कोल्हापूर शहरातील महावितरणच्या कार्यालयातच कार्यकारी अभियंता दीपक पाटील यांच्यासमोर डिझेल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. अचानक झालेल्या या घटनेने महावितरण कार्यालयात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, आक्रमक शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचाही प्रयत्न केला आहे. निवास पाटील असे डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. यावेळी महावितरण अधिकारी वीज तोडण्याचे समर्थन करताना दिसत होते.