नांदेड- पुढील महिन्यात राज्यातील सरपंचांना मिळणारे वाढीव मानधन मुख्यमंत्री साहाय्यता निधीला देणार असल्याचे सरपंच सेवा महासंघांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने जाहीर करण्यात आले. हा निर्णय सरपंच सेवा महासंघाच्या मुंबई येथील राज्य कार्यकारणीतील बैठकीत घेतल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील-चव्हाण यांनी सांगितले.
आमच्या अनेक मागण्या मान्य झाल्या आहेत, सरपंच मानधन वाढीसाठी मेहनत घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करणारा ठराव कार्यकारिणीच्या बैठकीत संमत करण्यात आला. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्याला दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मदत करण्याबाबत शासनाने निर्णय घ्यावा, असे निवदेन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. सरपंच सेवा महासंघाच्या सदस्यांनी यावेळी राज्यमंत्री दिपक केसरकर यांची देखील भेट घेतली.
सरपंच सेवा संघाचे राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, मानद अध्यक्ष चंद्रकांत बधाले, कार्याध्यक्ष माधवराव गंभीरे, कोअर कमिटी अध्यक्ष पंजाबराव चव्हाण, सचिव सुनील राहटे, राज्य प्रवक्ते सल्लागार हनुमंत सुर्वे, राज्य संपर्कप्रमुख राहुल उके, परभणी जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब गिराम, पालघर जिल्हा अध्यक्ष जनार्धन चांदणे, पुणे जिल्हा अध्यक्ष तात्यासाहेब सोनवणे, तिवसा तालुकाध्यक्ष मुकुंद पुनसे, योगेश बामगुडे, दिनेश गावंडे आदी सरपंच पदाधिकारी उपस्थित होते.