नांदेड - मराठा आरक्षणासाठी सत्ताधारी आणि विरोधीपक्ष दोघेही गंभीर नाहीत, अशी टीका खासदार संभाजीराजे भोसले यांनी केली आहे. आरक्षणासंदर्भात समाजाच्या भावना समजून घेण्यासाठी ते नांदेडात आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
मराठा समाजाच्या भावना जाणून घेतल्या -
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजातून सरकारबद्दल रोष व्यक्त केला जात आहे. आरक्षणासाठी विरोधक आणि सत्ताधारी प्रयत्नशील नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मराठा आरक्षण संदर्भात समाजाच्या भावना जाणून घेण्यासाठी तसेच आरक्षणासाठी पुढील भूमिका ठरवण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे मंगळवारी नांदेड दौऱ्यावर आले होते. मराठा आरक्षणाचा विषय हा कोणत्या एका राजकीय पक्षाचा किंवा गटाचा नाही, तर तो समाजाचा प्रश्न आहे, असेदेखील ते म्हणाले. आरक्षण रद्द झाले आहे, आता मागे झालेल्या चुका सुधारून आरक्षणासाठी मार्ग शोधला पाहिजे, याबाबद मराठा समाजातील प्रतिनिधींसोबत चर्चा करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.
कायदेतज्ञांशी करणार चर्चा -
यापुढे समाजाला वेठीस धरून आंदोलन केले जाणार नाही. पुढे जालना, औरंगाबाद, नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाची भूमिका जाणून घेणार असल्याचे देखील संभाजीराजे यांनी सांगितले. मात्र, मराठा आरक्षणासाठी लढा हा सुरुच राहणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह कायदे तज्ज्ञांशी चर्चा करणार आहे, असल्याचेही संभाजीराजे यांनी सांगितले. राज्यात केवळ २० टक्के मराठा समाज श्रीमंत आहे. मात्र, उर्वरित समाजाची आर्थिकस्थिती नाजूक आहे. त्यामुढे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मी सदैव आग्रही असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर इनोव्हाचा भीषण अपघात; दोन ठार, दोन जखमी