नांदेड - मराठवाड्यातील महसूल विभागाचे सर्व ११ हजार कर्मचारी आजपासून दोन दिवस संपावर जात आहेत. तसेच, या दोन दिवसांनंतर सलग येणाऱ्या तीन सुट्ट्यांमुळे मराठवाड्यात महसूल विभागाचे कामकाज पाच दिवस ठप्प असणार आहे. मात्र, या आंदोलनात तलाठी संघटना सहभागी होणार नाही.
अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे अद्याप बाकी आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील तलाठी कर्मचारी महसूल संघटनेच्या संपात सहभागी होणार नाहीत. तलाठी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सय्यद आयुब यांनी संघटनेची ही भूमिका जाहीर केलीय. महसूल कर्मचाऱ्यांच्या सामूहिक रजा आंदोलनास आपला बाहेरून पाठिंबा असेल, असे संघटनेने जाहीर केले आहे. आपत्तीत अडकलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी तलाठी कर्मचारी कार्यरत राहणार असल्याचे संघटनेने कळवले आहे.
महसूल कर्मचाऱ्यांच्या या आहेत मागण्या व अडचणी
मराठवाडा विभागातील प्रलंबित पदोन्नती, प्रलंबित विभागीय चौकशी, फौजदारी गुन्हे अशी कारणे देऊन तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल कर्मचारी, अधिकारी, शिपाई, कोतवाल, नायब तहसीलदार, तहसीलदार यांची पदोन्नती तशीच रखडत ठेवली आहे. बरेच असे तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल कर्मचारी, अधिकारी सेवानिवृत्त झाले व होत आहेत. परंतु, वेळोवेळी निवेदन देऊनही अद्याप या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. यासाठी हे आंदोलन करत असल्याचे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.