नांदेड - येलदरी धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी सर्व कालवे आणि उपकालव्यांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी केली आहे. कालव्यांची दुरूस्ती करण्यापूर्वीच पाणी सोडल्यास ते मोठ्या प्रमाणात वाया जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. सावंत यांनी यासंदर्भात जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना पत्र लिहिले आहे
पत्रामध्ये त्यांनी येलदरी धरणाच्या कालव्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधले आहे. मागील तीन वर्षापासून येलदरी धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे या धरणाशी जोडलेला आलेगाव-नाळेश्वर-चुडावा हा मुख्य कालवा आणि उपकालवे पूर्णतः नादुरूस्त झाले आहेत. या कालव्यांमध्ये मागील काही वर्षांपासून पाण्याचा प्रवाह नसल्यामुळे अनेक ठिकाणी माती साचून ते बुजले आहेत.तर अनेक ठिकाणी तडे गेले आहेत.
यावर्षी येलदरी धरण ६० टक्केच्या वर भरल्यामुळे या धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांना रब्बी व उन्हाळी हंगामासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. मात्र, सदोष कालव्यांमध्ये पाणी सोडल्यास त्याचा उपयोग कमी आणि अपव्यय अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येलदरी धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी आलेगाव-नाळेश्वर-चुडावा या मुख्य कालव्यांसह इतर छोट्या-मोठ्या उपकालव्यांची दुरूस्ती करण्यात यावी आणि त्यानंतरच पाणी सोडावे. जेणेकरून शेतकरी व नागरिकांना त्याचा अधिकाधिक लाभ होऊ शकेल, असे डी. पी. सावंत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा- 'सरसकट मदत जाहीर करा, अन्यथा शेतकऱ्यांना आत्महत्येची परवानगी द्या'