नांदेड : शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर संपर्कप्रमुख बबन थोरात यांची नांदेडमधील कार्यपद्धती चांगलीच चर्चेत आली आहे. निष्ठावंत जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे पाटील यांनाअडगळीत टाकून थोरात जिल्ह्यात चर्चेत आले आहेत. मात्र, आज एका निष्ठावंत शिवसैनिकाची हकालपट्टी केल्याने ठाकरे गटातील संभ्रम बाहेर आला आहे. त्यामुळे संपर्कप्रमुख बबन थोरात यांच्या विषयी प्रचंड खदखद असल्याचे दिसून येत आहे.
ठाकरे गटात गोंधळाचे वातावरण : विधान परिषदेचे विराेधी पक्षनेते अंबादास दानवे उद्या नांदेड दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याच्या तयारीसाठी आज शासकीय विश्रामगृहात संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बबन बारसे आणि मुदखेड उपतालुका प्रमुख गुलाब देशमुख यांच्यात शाब्दीत चकमक उडाल्यानंतर दोघांमध्ये फ्री स्टाईल हाणमारी झाली. त्यानंतर हा वाद शिवाजीनगर पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला होता. विरोधी पक्ष नेत्याच्या दौऱ्यापूर्वीच ठाकरे गटात गोंधळाचे वातावरण असल्याचे दिसून आले.
बैठकीत बाचाबाची : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शुक्रवारी हिंगोली, नांदेड दौऱ्यावर येणार आहेत. सायंकाळी जिल्हाभरातील पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेणार आहेत. त्याच्या दौऱ्याच्या तयारीसाठी गुरुवारी शासकीय विश्रामगृहात पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संपर्क प्रमुख बबन थोरात हे माजी खासदार सुभाष वानखेडे ज्यांनी तीन वेळा पक्ष बदलला त्यांची स्तुती करीत होते. त्याचवेळी मुदखेड उपतालुका प्रमुख निष्ठावंत कार्यकर्ते गुलाब देशमुख हे बैठकीतून उठले. मला दोन मिनिटे बोलू द्या, असे म्हणून त्यांनी थोरात यांना थांबविण्याचा प्रयत्न केला.
दोघांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी : त्यावेळी थाेरात यांनी देशमुख यांना खाली बसविले, अन् पुन्हा बोलण्यास सुरुवात केली. परंतू परत एकदा देशमुख उठले. त्यांनी थोरात यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संतप्त झालेल्या थोरात यांनी देशमुख यांना बाहेर निघून जा असे सांगितले. त्यावर देशमुख यांनी आम्हाला गेट आऊट म्हणता का? असा सवाल केला. त्यावेळी जिल्हाप्रमुख बबन बारसे हे रागाने देशमुख यांच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर दोघांमध्ये फ्री स्टाईल हाणमारी झाली. त्यानंतर देशमुख यांनी तक्रार देण्यासाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. यावेळी इतर पदाधिकाऱ्यांनी मध्यस्ती करुन त्यांची समजूत घातली. एकूणच या प्रकारामुळे ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
थोरात यांच्यावर जहरी टीका : संपर्कप्रमुख बबन थोरात हे भ्रष्टाचारी असून पक्षात पदे देण्यासाठी त्यांनी माझ्याकडून पैसे, सोने घेतले, असा गौप्यस्फोट कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये केला होता. बबन थोरात आणि विनायक राऊत हे पक्षातील पदे विकतात असा थेट आरोप बांगर यांनी केला होता. बांगर यांचे हे आरोप ठाकरे गटांकडून खोडण्यात आले नाही. उलट बांगर यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करत हा विषय संपवण्यात आला होता. आता पुन्हा एकदा आजच्या घटनेने संपर्क प्रमुख बबन थोरात चर्चेत आले आहेत.
जनाधार नसलेल्यांना थोरात पदे देतात : बबन थोरात यांनी नांदेडमध्ये ठाकरे गटाची कार्यकारिणी निवडतांना जनाधार नसलेल्या कार्यकर्त्यांना पदे दिले आसा आरोप त्यांच्यावर आहे. केवळ थोरातांची खातीरदारी करणाऱ्यांना थोरात पदे देतात अशी चर्चा ठाकरे गटात रंगली आहे. आजच्या हाणामारीसह प्रकरणावर बबन थोरात यांच्यासह जिल्हाप्रमुख बबन बारसे यांच्याशी संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.