नांदेड- हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशनवर पंजाबमधील तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने थरार पाहायला मिळाला. अन्याय झाल्याचे सांगत हा तरुण रेल्वे स्टेशन दादऱ्याच्या छतावर चढला होता. बुधवारी रात्री तब्बल चार तास हा थरार सुरू होता. पोलिसाच्या प्रयत्नाने या तरुणाचे प्राण वाचले आहे.
भगवंतसिंग (वय ३५) असे पोलिसांनी प्राण वाचविलेल्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण जिल्हा गुरुदासपूर, पंजाब येथील रहिवासी आहे. आर्थिक परिस्थिती हालखीची असल्यामुळे तो नांदेड येथील गुरुद्वारामध्ये कामाला आला होता. मात्र, मानधन मिळत नसल्यामुळे तो मनमाड येथे गेला. तिथे काही मित्रांसोबत वाद झाल्यानंतर तो पुन्हा नांदेड येथे परत आला होता.
हेही वाचा-लग्नाचे आमिष दाखवून महिला पोलीस शिपायावर हवालदाराचा वारंवार बलात्कार
सहकाऱ्यासोबत झाला होता वाद-
मनमाड येथील गुरुद्वाऱ्यात काम काम करत असताना भगवंतसिंह याचे काही सहकाऱ्यासोबत वाद झाले. त्यात हाणामारी झाली होती. सहकाऱ्यांनी मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचे या तरुणाने सांगितले. पैशाच्या देवाण-घेवणीतून हा वाद झाल्याची माहिती त्यांनी सांगितली.
हेही वाचा-..त्यामुळेच जयंत पाटलांच्या डोक्यात मुख्यमंत्री पद - रोहित पवार
नशेच्या धुंदीत चढला दादऱ्याच्या छतावर-
मानसिकरीत्या खचलेल्या भगवंतसिंह याने नशा करण्यासाठी काही औषधांचा वापर केला होता. या नशेच्या धुंदीत त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. तो रेल्वे पटरीवरदेखील झोपला होता. मात्र प्रवाशांनी त्याला रोखले होते. त्यानंतर तो बुधवारी रात्री आठच्या सुमारास रेल्वे दादऱ्याच्या छतावर चढला. पत्रकारांना बोलवा आणि माझे म्हणणं एकूण घ्या, असे या व्यक्तीचे म्हणणे होते. या व्यक्तीला नागरिक आणि रेल्वे पोलिसांनी खाली उतरण्याची विनंती केली. मात्र, तो ऐकयला तयार नव्हता.
चार तास सुरू होता थरार-
या व्यक्तीला खाली उतरण्यासाठी पोलीस आणि अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांनी विनंती केली. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. रात्री बारा वाजता या व्यक्तीला काही शीख तरुण आणि पोलिसांनी मोठ्या कसरतीने खाली उतरविले. आत्महत्येच्या प्रयत्नाचा हा थरार तब्बल चार तास सुरू होता.
रेल्वे पोलीस निरीक्षक सोपान नाईक म्हणाले की, तरुणाने मानसिक संतुलन बिघडण्याचे सांगितले आहे. पुढील कारवाई आम्ही करत आहोत.