नांदेड - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पिकेल ते विकेल या उपक्रमा अंतर्गत संत सावता माळी रयत बाजारासाठी जवळपास 60 स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. या स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळत असून या बाजाराकडे ग्राहक देखील मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. जवळपास दररोज 25 ते 30 लाखाच्या आसपास उलाढाल या बाजाराच्या माध्यामातून होत असून ही एकूण दीड कोटीपर्यंत पोहोचेल असे अपेक्षित आहे.
नांदेडच्या रयत बाजाराला उत्तम प्रतिसाद प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कृषी विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात या बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. २६ जानेवारी ते २९ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या तीन दिवसीय रयत बाजाराचे उद्घाटन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते. या उपक्रमाला सध्या उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
नाविन्यपूर्ण उत्पादने विक्रीसाठी उपलब्धविविध स्टॉलला मान्यवर व ग्राहकांनी भेटी देऊन शेतकऱ्याची आणि त्याच्या शेतमालाची आस्थेवाईकपणे पाहणी करून व चर्चा करून त्यांनी समाधान व्यक्त केले. या समारंभात जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील मालासह मोठ्या प्रमाणावर उपस्थिती नोंदवली. या शेतीमालाव्यतिरिक्त रेशीम उद्योग, मत्स्यव्यवसाय, गांडूळ खत, महिला बचत गट यांच्यामार्फत उत्पादीत उत्पादने मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आली आहेत. तसेच फळे, भाजीपाला विविध प्रकारचे धान्य, डाळी, मध, गूळ, ओल्या भुईमूग शेंगा, रसवंती असे अनेक शेती उत्पादने त्याचबरोबर सफेद मूसळी, ड्रॅगन फ्रुट, स्ट्रॉबेरी, अशी नाविन्यपूर्ण उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
शेतकऱ्यांना अधिक दर ग्राहकांना मार्केट पेक्षा स्वस्त...!या उपक्रमास अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणावर या सर्व शेतीमालाची विक्री झाली. ग्राहकांना ताजा माल मिळाला आणि थेट विक्रीमुळे शेतकऱ्यांनासुद्धा अधिकचा दर मिळून फायदा झाला. हा उपक्रम या पुढेही दिनांक 29 जानेवारीपर्यंत हा बाजार जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवीशंकर चलवदे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी जागा उपलब्धतेसाठी प्रयत्नशील- पालकमंत्री शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विकेल ते पिकेल धोरणाअंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान हे अत्यंत दिशादर्शक आहे. ज्याची मागणी आहे ते आपल्या शेतात पिकवून बाजारपेठेत त्या शेतमालाच्या विक्रीचे कसब शेतकऱ्यांनी अंगीकारल्यास निश्चितच अधिकचा लाभ होईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.