नांदेड - नांदेडमध्ये पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेडमधील बंगल्यावर दगड फेक झाली. या घटनेने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. रस्त्यावरून भांडत जाणाऱ्या एका मनोरुग्ण महिलेने सोबत असलेल्या इसमावर दगड फेक केली. त्यातील एक दगड चव्हाण यांच्या बंगल्यावर लागला. त्यात चव्हाण यांच्या सुरक्षा कक्षाच्या काचेचे किरकोळ नुकसान झाले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी मोठा फौजफाटा घेत बंगल्याकडे धाव घेतली. घटनास्थळी आल्यावर दगडफेकीचा घटनाक्रम लक्षात आल्यावर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
एकमेकांवर दगड फेकणाऱ्या त्या मनोरुग्ण महिलेसह तिच्या साथीदाराचा पोलीस सध्या शोध घेत असून, याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, बुधवारी सकाळी १० च्या सुमारास अज्ञात महिलेने अशोक चव्हाण यांच्या बंगल्यावर दगडफेक केली. यावेळी बंगल्यावर काही सुरक्षारक्षक उपस्थित होते. परंतु, अशोक चव्हाण हे मंगळवारी सकाळी मुंबईला गेलेले आहेत. तसेच, त्यांचे कुटूंबही मुंबईतच आहे.