नांदेड - मराठवाड्यात भौगोलिकदृष्ट्या मोठा असलेला नांदेड जिल्हा तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत औरंगाबाद, जालनाच्या तुलनेत जिल्ह्यात पक्षाने समान यश संपादन केले आहे. यामुळे होऊ घातलेल्या सरकारच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये नांदेड जिल्ह्याचा विचार नक्कीच करावा अशी स्थिती आहे. त्यामुळे भाजप जिल्हाध्यक्ष आ. राम पाटील रातोळीकर यांना संधी द्यावी अशी मागणी भोकरचे विधानसभा अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे, की लवकरच भाजप पक्ष श्रेष्ठीकडे असंख्य कार्यकर्त्यांच्या सह्यांचे निवेदन देऊन ही मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांशी कसलाही दुजाभाव न करता पक्षाच्या चाकोरीत राहून भाजपला जास्तीत जास्त यश कसे मिळेल, यासाठी टोकाचे प्रयत्न करुन भाजपचे ३ आमदार निवडून आणण्यात आ. रातोळीकरांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. भाजपच्या यश संपादनात महत्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे.
हेही वाचा - विष्णुपूरी प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडले; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
तसेच १० वर्ष जिल्हाध्यक्ष पदाचा अनुभव, सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी नाळ जोडणारा नेता म्हणून आ. रातोळीकर यांनी पक्ष पातळीवर ओळख निर्माण केली आहे. अशा व्यक्तीस नांदेड जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर कालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपची विस्कटलेली घडी निस्तारन्यास नक्कीच मदत होईल. असा विश्वास भाजप भोकर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसाने खरीप वाया; शेतकरी आर्थिक अडचणीत