नांदेड - श्री गुरु नानक देवजी महाराज यांच्या ५५० व्या प्रकाश पर्वानिमित्त हलदौर (बिजनौर) येथून प्रकाश उत्सव यात्रा निघाली. या यात्रेचे नांदेड येथे गुरुवारी (१५ ऑगस्ट) सायंकाळी ६ वाजता आगमन होणार आहे.
यावर्षी १२ नोव्हेंबर रोजी कत्तक सुदी पुरणमासीच्या दिवशी शीख धर्माचे पहिले गुरु श्री गुरु नानक देवजी महाराज यांच्या ५५० व्या प्रकाश पर्वानिमित्त विविध कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहेत. हा प्रकाश पर्व राष्ट्रीय स्तरावर उत्साहात साजरे होत आहे. या कार्यक्रमासाठी आणि श्री गुरु नानक देवजी महाराज यांनी मानवतेसाठी दिलेल्या उपदेशांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विविध यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यातीलच एक हलदौर (बिजनौर) येथून गुरुद्वारा श्री गुरु नानक बाग यांच्या कमिटीतर्फे प्रकाश उत्सव प्रचार यात्रेचे आयोजन करण्यात आले. ही यात्रा देशाच्या विविध प्रांतातून आणि ऐतिहासिक गुरुद्वारा साहिबचे दर्शन करुन हुजूर साहिब नांदेड येथे १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता येणार आहे. मालेगाव-कासारखेडा-मालटेकडी-नंदीग्राम सोसायटी-बाफनापासून गुरुद्वारा गेट क्रमांक १ येथे ही यात्रा येईल.
या यात्रेचे सिंधी कॉलनी बाफनापासून नगर कीर्तन प्रारंभ होईल. हे नगर कीर्तन बाफना-अबचलनगर कॉलनी-गुरुद्वारा गेट क्रमांक एकपर्यंत पोहोचेल. तसेच दरबार साहिब येथे या कीर्तनाचा समारोप होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी ही यात्रा गुरुद्वारा श्री नानक झिरा साहिब, बिदरसाठी प्रस्थान करेल. यावेळी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री गुरु महाराजांचे आर्शीवाद प्राप्त करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.