नांदेड - जिल्ह्यातील अर्धापूर पंचायत समितीच्या महिला गटविकास अधिकाऱ्याला नांदला दिग्रस येथील एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. मिना रावताळे असे या महिला गटविकास अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी संबंधीत शशिकांत क्षीरसागर या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे.
हेही वाचा - घातवार; दिवसभरात तब्बल चार आत्महत्यांच्या घटना उघडकीस
मिना रावताळे यांच्या दालनात जाऊन, तू महिला अधिकारी आहे म्हणून वाचलीस, अन्यथा तू पुरुष अधिकारी असतीस तर तुला पहिल्या माळ्यावरून खाली फेकून दिले असते, अशी दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी शशिकांत क्षीरसागर याने दिली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की ३० नोव्हेंबरला अर्धापूर पंचायत समितीमध्ये शासकीय काम करत असताना एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या शशिकांत पाटील क्षीरसागर याने पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये ग्रामपंचायत दिग्रस-नांदलाच्या १४ व्या वित्त आयोगाच्या आदेशास मान्यता दिली होती. पण, याच कारणावरून क्षीरसागर याने गटविकास अधिकाऱ्याच्या दालनात जाऊन एकतर्फी बोलून शिवीगाळ केली. गटविकास अधिकारी मिना रावताळे यांना पुरुष अधिकारी असता तर तुला पहिल्या माळयावरुन खाली फेकून दिले असते, अशी जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तू महिला आहेस म्हणून वाचलीस, असे बोलून काचेवर जोरजोरात हात आपटून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी गटविकास अधिकारी मिना रावताळे यांच्या तक्रारीवरुन शशिकांत क्षीरसागर याच्याविरुद्ध कलम ३५३, ५०६, भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. के. सुरवसे हे करत आहेत.
पंचायत समितीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन
मागे अनेकवेळा शशिकांत क्षीरसागर याने पंचायत समितीमध्ये धुडगूस घातला होता. ३० नोव्हेंबरलाही हा प्रकार घडला. या घटनेचा पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी काळ्या फिती लावून आंदोलन केले.