नांदेड - शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीदरम्यान समाजकंटकांकडून अनुचित प्रकार घडू नये. यासाठी शहर आणि जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही आणि ड्रोनचे लक्ष राहणार असून स्वत: पोलीस अधिक्षक संजय जाधव आणि अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांची नजर राहणार आहे.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मंगळवारी मोठ्या उत्साहाने साजरी होणार आहे. शहरात सर्वत्र मुख्य चौक आणि रस्त्यावर महाराजांचे कटआऊट लावून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. या दरम्यान काही समाजकंटक मिरवणुकीत घुसून कायदा आणि सुव्यवस्था बाधीत करू शकतात. त्यामुळे अशा प्रवृतीवर लक्ष केंद्रीत करून त्यांचे डाव उधळून लावण्यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात आले असून प्रत्येकाची हालचाल टिपण्यासाठी ड्रोन कॅमेरे घिरट्या घालणार आहे.
शिवभक्तांनी मिरवणुकीत डिजे लावून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश धुडकावून लावू नये. शहर वाहतूक शाखा आणि पोलिसांनी घालुन दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस अधिक्षक संजय जाधव यांनी केले आहे.
शहरात असा आहे बंदोबस्त
१७ पोलीस निरीक्षक, ७४ सहाय्यक पोलिस निरीक्षक/फौजदार, ७७१ पोलीस कर्मचारी, आरसीपीच्या ८ तुकड्या, राज्य राखीव बलाची एक कंपनी, गृहरक्षक दलाचे ५५० जवान यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा असा दीड हजार पोलिस तैनात केले आहेत.