नांदेड - कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यामधील आणखी एक आरोपी अद्याप फरार आहे. मैत्रीचा गैरफायदा घेत तिघांनी महिलेवर अत्याचार केला होता. तसेच पीडितेचे अश्लील फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यानंतरही त्यांनी वारंवार अत्याचार केले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित महिला कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी अहमदपूरहून नांदेड येथे येत असे. दरम्यान, या महिलेची कॉलेजमधील संदीप ढगे, सोमेश पुरी आणि मंगेश लांडगे यांच्याशी ओळख झाली. या मैत्रीचा गैरफायदा घेत तिघांनी तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला होता. त्यानंतर तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार करत होते. पीडित महिला विवाहित असल्याची माहिती मिळत आहे.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यातील आरोपी सोमेश पुरीसह मंगेश लांडगेला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस निरिक्षक चंद्रशेखर चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक के.एस.पठाण यांचे पथक पुढील तपास करत आहेत.