नांदेड - अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या 20 वर्षीय तरुणास पाचव्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश शिल्पा तोडकर यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या पित्याने 24 एप्रिल 2019 रोजी तक्रार दिली होती. त्यनुसार 21 एप्रिल रोजी ते आणि त्यांचे सर्व कुटुंबीय जेवण करून झोपले होते. 22 एप्रिल रोजी सकाळी त्यांच्या पाच मुलींपैकी एक अल्पवयीन मुलगी घरातून गायब होती. यानंतर त्यांनी तीचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. अखेर 24 एप्रिल 2019 रोजी त्यांनी पोलीस ठाणे बारड येथे तक्रार दाखल केली. या तक्रारीत त्यांनी अज्ञात व्यक्तीने आपल्या मुलीला पळवून नेल्याचा आरोप केला होता. मात्र, पोलीसांनी शोध घेतल्यनंतर संबंधित अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्याचे नाव मोहम्मद वसीम अब्दुल माजीद (वय 20 वर्षे, रा. इस्लामपूरा ) असल्याचे समोर आले आहे. रविवारी दिनांक 12 मेरोजी मोहम्मद वसीमने या मुलीला पळवून नेले होते.
हे दोघेही मुदखेड येथे असल्याचे पोलिसांना समजताच मुदखेडचे पोलीस निरीक्षक सोहन माचरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या दोघांना ताब्यात घेऊन कायदेशीरपणे बारड पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी आरोपीवर भादंवी कलम ३७६, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्सो), तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोकरचे पोलीस उपाधीक्षक बी. मुदीराज यांनी सोमवारी मोहम्मद वासीम अब्दुल मजीदला न्यायालयात हजर केले. सहाय्यक सरकारी वकील अॅड. मणीकुमारी बतुल्ला यांनी या प्रकरणात पोलिस कोठडी देणे का आवश्यक आहे, यासंदर्भाने सविस्तर मांडणी केली. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश तोडकर यांनी अनुसूचित जातीच्या अल्पवयीन बालिकेला पळवून नेणाऱया मोहम्मद वसीम अब्दुल माजीदला 16 मे, 2019 पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.