नांदेड - वाळू माफियांविरुद्ध प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहे. वासरी येथे गोदावरी नदीपात्रात अवैधरित्या २ सक्शनपंपाद्वारे वाळू उपसा होत असल्याचे निदर्शनास आले होते. मुदखेडचे तहसीलदार दिनेश झापले, नायब तहसीलदार संजय सोलकर, पोलीस निरीक्षक माछारे यांच्या पथकाने सक्शन पंप लावण्यात आलेल्या अज्ञात बोटी स्फोट करून उडवून दिल्या आहेत. या कारवाईने अवैध वाळू माफियांना हा मोठा दणका बसला आहे.
तहसीलदार दिनेश झापले, नायब तहसीलदार संजय सोलंकर व संजय भोसीकर तसेच पोलीस निरीक्षक माछारे व सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे यांनी वासरी तालुका, मुदखेड तहसील मुदखेड, नांदेड येथील महसूल नदीपात्र पिंजून काढले होते. रात्री सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे यांना वासरी येथे गोदावरी नदी पात्रात दोन बोटी आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्या बोटी स्फोट करुन उडवून दिल्या. या कारवाईने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.