नांदेड : माहूर तालुक्यातील वडसा येथे २५ मे रोजी कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासनासह तालुक्यातील नागरिकांत खळबळ उडाली होती. हा रुग्ण मुंबईच्या विक्रोळी भागातून २१ मे रोजी रात्री वडसा येथे आला होता. गावकऱ्यांनी रुग्ण व त्याच्यासोबत आलेल्या काका, काकू, चुलत बहीण अशा चौघांना त्याच रात्री माहूर येथील स्वतंत्र कक्षात ठेवले होते. त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. २५ मे रोजी त्या तरूणाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याच्यावर माहूर येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते. या उपचारातून तो बरा झाल्याने त्याला सोमवारी सुट्टी देण्यात आली.
माहूरसारख्या छोट्या शहरातील डॉक्टर आणि प्रशासनाने राबविलेल्या उपाययोजनांमुळे एक रुग्ण बरा होऊन सुखरूप घरी पोहचल्याने त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्याला निरोप दिला. या वेळी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही. एन.भोसले, डॉ. किरण वाघमारे, डॉ.मोरे, निरंजन केशवे, डॉ. सय्यद शेख, डॉ. आंबेकर, डॉ. मुंगीलवार उपस्थित होते. या रुग्णाला सुट्टी देण्यात आली असली तरी आगामी सात दिवस तो होम क्वारंटाइन असेल.