नांदेड - कोरोना विषाणुमुळे उद्भवलेली परिस्थिती आणि या विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे विभागाने नवीन आदेशानुसार ३ मे रात्री बारा वाजेपर्यंत सर्व प्रवासी रेल्वे गाड्या बंद राहणार असल्याचे जाहीर केले आहे. या कालावधीत रेल्वे माल वाहतूक आणि पार्सल वाहतूक सुरु राहिल, असे दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत रेल्वेचे कुठल्याही प्रकारचे तिकीट (आरक्षित किंवा अनारक्षित) बुक करता येणार नाहीत. ऑनलाईन तिकीट रद्द करण्याची सुविधा सुरु राहिल. प्रवाशांना रद्द तिकीटाची पूर्ण रक्क्म परत दिली जाईल. ऑनलाईन तिकीटाची रक्कम प्रवाशांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल, असे रेल्वे विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे. लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे तिकीट रिफंड रूल्स-परतावा नियमात तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
रेल्वे विभागाने कळविलेल्या ठळक बाबी -
१) दिनांक ३ मे २०२० पर्यंतच्या रेल्वे गाड्यांचे ऑनलाईन तिकीट काढले असल्यास त्या तिकीटाचे पैसे प्रवाशांच्या खात्यामध्ये रेल्वे जमा करेल.
२) रेल्वे स्थानकावरुन काढलेल्या तिकीटाकरता पुढील नियम लागू राहतील
२१ मार्च ते प्रवाशी गाड्या सुरु होईपर्यंत किंवा पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत भारतीय रेल्वे तर्फे ज्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यावर पुढील प्रमाणे नियम लागू होतील -
आरक्षित असणाऱ्या रेल्वे तिकिटांवर रेल्वे स्थानकावरील आरक्षण कार्यालयात जाऊन रेल्वे प्रवासाच्या ९० दिवसापर्यंत तिकीट रद्द करता येईल. दुसऱ्या परिस्थितीत भारतीय रेल्वेने दिनांक २१ मार्च ते प्रवाशी गाड्या सुरु होईपर्यंत किंवा पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत गाडी रद्द केलेली नाही. परंतु, प्रवाशाला प्रवास करायचा नाही. अशा परिस्थितीत तिकीट डिपॉजिट रिसिप्ट (टी .डी.आर. ) प्रवासाच्या तारखेपासून ९० दिवसापर्यंत रेल्वे स्थानकावर जाऊन दाखल करता येईल. तसेच प्रवाशाला प्रवासाच्या तारखेपासून तिकीट डिपॉजिट रिसिप्ट (टी.डी.आर.) मुख्य वाणिज्य व्यवस्थापक किंवा क्लेम्स ऑफिसला ६० दिवसापर्यंत पाठवता येईल. याचा परतावा ट्रेन चार्ट तपासून करण्यात येईल. ज्या प्रवाशांचे १३९ नंबरवरून तिकीट रद्द केले असेल, अशा प्रवाशांना रेल्वे आरक्षण कार्यालयात प्रवासाच्या तारखेपासून ९० दिवसापर्यंत आपले पैसे परत घेता येतील. प्रवाशांनी या तात्पुरत्या बदलेल्या नियमांचा उपयोग करावा आणि रेल्वे स्थानकावर गर्दी करण्याचे टाळावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.