नांदेड Sikh Marriage : नांदेडचे तख्त सचखंड श्री हुजूर साहिब येथील पंचप्यारे साहिबांनी शिख धर्मातील लग्नाबाबत तीन महत्वाचे निर्णय घेतले आहेत. शीख धर्मात पंचप्यारे यांनी घेतलेल्या निर्णयाला धार्मिकदृष्ट्या फार महत्व असतं. आता त्यांच्या या निर्णयाचं शीख धर्माच्या अनुयायांनी स्वागत केलं आहे.
कोणते निर्णय घेतले : शिख धर्मातील लग्नाबाबत, नांदेडच्या तख्त सचखंड श्री हुजुर साहिब अबचल नगर येथील पंचप्यारे साहिबाननं तीन निर्णय घेतले. लग्नात नवरी मुलीनं परिपूर्ण पंजाबी सूट आणि सलवार परिधान करावं, लग्नाच्या पत्रिकेत 'सिंग' आणि 'कौर' अश्या नावांचा उल्लेख असावा आणि नवरी मुलीला लग्न मंडपात आणताना छत्र वापरू नये, असे निर्णय यावेळी घेण्यात आले आहेत.
लग्न पत्रिकेवर 'सिंग' आणि 'कौर' नावाचा उल्लेख : शिख धर्मात 'सिंग' आणि 'कौर' हे खिताब शिखांचे दहावे गुरु श्री गुरुगोविंद सिंग यांनी दिले होते. आपल्या धर्मासाठी त्यांनी स्वत:चं बलिदानही दिलं होतं. मात्र लग्न पत्रिकेवर नवरदेवाच्या नावामागे 'सिंग' आणि नवरीच्या नावामागे 'कौर' असा उल्लेख केला जात नसल्याचं दिसून आलयं. यामुळे या नव्या नियमांत, लग्न पत्रिकेवर 'सिंग' आणि 'कौर' नावाचा उल्लेख करण्याचं सांगण्यात आलंय.
परिपूर्ण पंजाबी सूट आणि सलवार परिधान करावं : शिख धर्मात लग्नात फेऱ्यांच्या वेळेस नवरी मुलगी महागडे कपडे परिधान करते. मात्र आता तसं न करता, फेऱ्यांच्या वेळेस नवरीनं परिपूर्ण पंजाबी सूट आणि सलवार परिधान करावं, असं नव्या निर्णयात सांगण्यात आलंय. याशिवाय नवरी मुलीला जेव्हा लग्न मंडपात आणलं जातं, तेव्हा तिच्या डोक्यावर ओढणी किंवा फुलाची सजावट असलेलं छत्र वापरण्यात येत असल्याचं दिसून आलं आहे. मात्र यामुळे गुरुग्रंथ साहिब यांची मर्यादा राखली जात नाही. त्यामुळे लग्न मंडपात नवरी मुलीला आणताना छत्र वापरू नये, असा निर्णयही घेण्यात आला आहे.
हे वाचलंत का :